लंडन: वृत्तसंस्था । अमेरिकेच्या जागतिक आर्थिक महासत्तेला आव्हान देणारा चीन आता अमेरिकेची जागा हिसकावून घेणार आहे. अमेरिकेला पछाडत चीन २०२८ मध्ये जागतिक महासत्ता होणार आहे
लंडनमधील ‘सेंटर फॉर इकोनॉमिक्स अॅण्ड बिझनेस रिसर्च’च्या वार्षिक अहवालात हे नमूद करण्यात आले आहे. २०३० च्या दशकाच्या सुरुवातीला भारताची अर्थव्यवस्था भरारी घेणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
याआधी चीन २०३३ पर्यंत जागतिक आर्थिक महासत्ता होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. कोरोना महासाथीच्या आजारामुळे मंदावलेली चीनची अर्थव्यवस्था वेगाने सावरत असून आता धावू लागली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची गती अद्यापही मंदावलेली आहे. यामुळेच अमेरिकेपेक्षा चीनची अर्थव्यवस्था वेगाने वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोरोना विषाणू चीनच्या वुहान शहरातून सुरू झाला. मात्र, चीनने आपल्या स्कील मॅनेजमेंटच्या माध्यमातून महासाथीच्या आजारावर नियंत्रण मिळवले. सक्तीने लॉकडाउन लागू केला आणि त्यामुळेच पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत चीनची अर्थव्यवस्था वेगाने सावरू लागली आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेत वर्ष २००० मध्ये चीनचा हिस्सा ३.६ टक्के होता. तर, २०२० मध्ये हा वाटा १७.८ टक्के झाला. तर, भारताची अर्थव्यवस्था २०३० च्या दशकाच्या सुरुवातीला जपानला मागे टाकून जगातील तिसरी अर्थव्यवस्था होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वर्ष २०२१ ते २०२५ दरम्यान चीनच्या आर्थिक विकास दरवाढीचा दर ५.७ टक्के इतका असू शकतो. तर, २०२६-३० मध्ये ४.५ टक्के इतका वेग असू शकतो. त्याशिवाय २०३० ते २०३५ दरम्यान चीनच्या आर्थिक विकासाचा दर ३.९ टक्के इतका असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, अमेरिकेचा आर्थिक विकास दर २०२२ ते २०२४ दरम्यान फक्त १.९ टक्के असण्याची शक्यता आहे.