बिश्केक शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला फटकारले

bf8e572fd2e24d209a1e4561292fb58e 18

बिश्केक (वृत्तसंस्था) येथे सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत (एससीओ) दहशतवादाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला नाव न घेता खडे बोल सुनावले. आजच्या घडीला दहशतवाद ही मोठी समस्या बनली असून दहशतवादाविरोधात सर्व मानवतावादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मोदी यांनी परिषदेत केले.

 

दहशतवादाला समर्थन, प्रोत्साहन देणाऱ्या, तसेच त्यासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या राष्ट्रांविरोधात बोलण्याची गरज असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्टपणे म्हटले. दहशतवादाविरोधातील आपले संकुचित विचार सोडून मानवतावादी शक्तींनी पुढे आलेच पाहिजे, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात दहशतवादासहीत इतर अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या राष्ट्रांनी पुन्हा एकदा विचार करण्याची गरज असल्याचे म्हणत त्यांनी आपल्या भाषणात अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला दहशतवादाविरोधात ठोस कारवाई करण्याचे आवाहन केले. दहशतवादाशी दोन हात करण्यासाठी सर्व एससीओ देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचेही मोदी म्हणाले.

मोदींच्या भाषणातील अन्य मुद्दे :-
आधिनिक काळात उत्तम संपर्क यंत्रणेची गरज असून लोकांमध्ये संपर्क महत्त्वाचा आहे.
भारतात एससीओ देशांमधून आलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाइनची व्यवस्था करण्यात आली आहे.
भारत हा अक्षय ऊर्जा उत्पादनात जगात सहावा आणि सौर ऊर्जा उत्पादनात पाचवा देश आहे.
आजच्या घडीला आम्हाला (एससीओ देशांना) बहुपक्षीय व्यापार प्रणालीची आवश्यकता आहे.

Protected Content