अमेरिकी सैनिकांना मारण्यासाठी चीनकडून अतिरेक्यांना बक्षिसे !

 

 

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अफगाणिस्तानात तैनात असणाऱ्या अमेरिकेच्या सैनिकांवर हल्ले करत त्यांना मारण्यासाठी दहशतवादी टोळ्यांना चीन आर्थिक बक्षिसे देत आहे, अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तहेर यंत्रणांच्या अहवालामध्ये देण्यात आली आहे.

हा अहवाल नुकताच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सादर करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्या अध्यक्षपदावरील काही दिवस शिल्लक असतानाच अहवाल आला आहे. पूर्वी रशियाकडून अशाच पद्धतीने अमेरिकी सैनिकांवरील हल्ल्यांसाठी बक्षिसे देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली होती. ट्रम्प यांनी मात्र अफवा असल्याचे सांगून ती माहिती फेटाळली होती.

 

गुप्तहेर संस्थांनी १७ डिसेंबर रोजी लेखी स्वरूपामध्ये हा अहवाल सादर केला आहे आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनीही तोंडी स्वरूपामध्ये ही माहिती ट्रम्प यांना दिली. या विषयीचे वृत्त अमेरिकी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे, त्याला काही अधिकाऱ्यांनी दुजोराही दिला आहे. मात्र, आतापर्यंत झालेल्या कोणत्या हल्ल्यासाठी चीनने बक्षिस दिले आहे किंवा या पद्धतीने हल्ल्याचा कोणता प्रयत्न झाला आहे का, याची माहिती समोर येऊ शकलेली नाही.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील सायबर हल्ल्यांमागे चीन असल्याचा दावाही ट्रम्प यांनी केला होता. अफगाणिस्तानातील हल्ल्यांसाठी बक्षिसे दिल्याच्या माहितीमध्ये तथ्य आढळले, बायडेन यांच्या कार्यकाळातील दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, असे मानले जाते. सत्ता हस्तांतराच्या प्रक्रियेतील बायडेन यांच्या अधिकाऱ्यांकडेही दैनंदिन गुप्तचर माहिती सादर करण्यात येते. मात्र, त्यांना चीनविषयीची ही माहिती सादर करण्यात आली की नाही, हे समजू शकलेले नाही.

ट्रम्प यांचा कार्यकाळ संपत असतानाच, चीनवरील दबाव वाढविण्यासाठी सध्याच्या सरकारमधील अधिकारी प्रयत्नशील आहेत. नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांचे सरकार चीनबरोबरील संबंधांतील तणाव कमी करण्यासाठी पावले टाकण्याची शक्यता आहे. त्याआधी चीनविरोधी दबाव वाढविण्याचा या अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे.

काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानमध्ये १० चिनी गुप्तहेरांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून स्फोटकेही जप्त करण्यात आली होती. या गुप्तहेरांचे संबंध हक्कानी नेटवर्क आणि अफगाणिस्तानमधील तालिबानी दहशतवाद्यांसोबत असल्याचे समोर आले. गुप्तहेरांच्या अटकेनंतर जगभरात चीनची नाचक्की झाली. अफगाणिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी चिनी गुप्तहेरांना अटक केली.

Protected Content