अमिताभ बच्चन यांना यंदाचा एफआयएएफ पुरस्कार

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । अमिताभ बच्चन यांना इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म अर्काईव्हसतर्फे दरवर्षी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2021 चा  एफआयएएफ पुरस्कार देण्यात येणार आहे.

बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या पुरस्काराने सन्मानितही करण्यात आलं आहे. बॉलीवूडच्या  महानायकाचा सन्मान आता हॉलीवूडही करत आहे.

हॉलीवूडचे फिल्ममेकर मार्टीन स्कोर्सेस आणि ख्रिस्तोफर नोलन यांच्या हस्ते अमिताभ यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.या दोघांनीही अमिताभ यांनी चित्रपटक्षेत्रात केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे. अमिताभ यांनी भारतीय चित्रपट परंपरा अबाधित राखल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देत असल्याचं या दोघांनी म्हटलं आहे.

अमिताभ याविषयी म्हणतात, या वर्षीचा हा पुरस्कार मला मिळणं हा माझा सन्मान आहे. मी सदैव समर्पण भावनेनं काम करत राहीन.

अमिताभ बच्चन हे आयुष्मान खुरानासोबत गुलाबो सिताबो या चित्रपटात दिसले होते. लवकरच ते रुमी जाफरीच्या चेहरे या चित्रपटात इमरान हाश्मी सोबत दिसतील. रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्यासोबत त्यांचा ब्रम्हास्त्र हा सिनेमाही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगणसोबत मेडे या चित्रपटातही ते दिसणार आहेत.

Protected Content