मुंबई प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील अपघातात मृत झालेल्यांच्या आप्तांना राज्य शासनाने प्रत्येकी दोन लाख रूपयांची शासकीय मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती देत या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
किनगाव (ता. यावल) येथे पपई घेऊन जाणाऱे आयशर वाहन पलटी होऊन त्यात १५ मजूर मृत्यूमुखी पडले. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
मृत मजूर हे रावेर तालुक्यातील रहिवाशी असून यात सहा महिला व नऊ पुरूष आहेत. हा अपघात दुर्देवी असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मृत मजुरांच्या कुटुंबियाप्रती आपली सहवेदना व्यक्त केली आहे. याशिवाय अपघातात गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या मजुरांवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्हा प्रशासनाकडून घटनेची माहिती घेतली. तसेच संबंधित अपघातग्रस्तांना सर्व ती आवश्यक मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.