वयोवृद्धांनी आपल्या दांडग्या अनुभवाचा फायदा तरुण पिढीला मिळवून दिला पाहिजे : डॉ. प्रदिप जोशी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वयोवृद्धांनी आपल्या दांडग्या अनुभवाचा फायदा तरुण पिढीला मिळवून दिला पाहिजे, असे भावनिक आवाहन मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदिप जोशी यांनी केले.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सहायक आयुक्त , समाज कल्याण कार्यालय, जळगाव आयोजित जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील अल्पबचत भवनात दि.१ आक्टोंबर २०२२ रोजी उत्साहात संपन्न झाला. यावेळी  मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदिप जोशी यांनी “संध्या छाया ” या विषयावर व्याख्यान दिले. अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविण महाजन  तर प्रमुख अतिथी आ. राजुमामा भोळे, सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, माजी अध्यक्ष फेसकॉम जे. टी. चौधरी , विवेकानंद प्रतिष्ठान संचलित मातोश्री वृद्धाश्रम प्रकल्प  कार्यकारी संचालक कांकरीया मॅडम  , अॅड. चैतन्य भंडारी , डॉ. ज्योती गाजरे , तृतीय पंथी ज्येष्ठ प्रतिनिधी  सिमाजान गुरु आदी  व्यासपिठावर उपस्थित होते.

डॉ .जोशी मार्गदर्शनात पुढे म्हणाले की , ” पदोपदी जुन्या गोष्टी आळवण्यापेक्षा नवीन गोष्टींचे कौतूक करा. समायोजन करून दोन पिढ्यांमधील अंतर कमी करा. वृद्धापकाळात येणाऱ्या ३ प्रमुख समस्या – शारीरिक आरोग्य ,आर्थिक स्तर , एकटेपणा यावर सांगोपांग विचार मांडून उपाय योजना सांगितल्या. नवीन संधी शोधून स्वतःला कामात व्यस्त ठेवा. समाजकार्यात अथवा सामाजिक संस्थांमध्ये योगदान द्या. नकारात्मक बोलण्याची प्रवृत्ती टाळली की तुमचा सहवास लोकांना आनंदी वाटेल. तरुण पिढीला दोष न देता समायोजनाची जबाबदारी उत्स्फूर्तपणे घेऊन कुटूंबात सुसंवाद साधा आणि घराला स्वर्ग बनवा.

ॲड. चैतन्य भंडारी ” ज्येष्ठांसाठी सायबर सुरक्षा ” या विषयानुषंगे मार्गदर्शनात ऑनलाईन गुन्ह्यांचे प्रकार व प्रकरण सोदाहरण सांगितले. अनोळखी फोनची खात्री केल्याशिवाय कोणत्याही लिंकला क्लिक करु नका. कुणाच्या हातात डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड देऊ नका. कुणालाही आधार कार्ड नंबर व प्रसंगी ओटीपी नंबर देऊ नका आदी माहिती देवून त्यांनी उपस्थित ज्येष्ठांच्या शंकांचेही यथोचित उत्तरे दिली.

“मधुमेह आणि जीवनशैली ” या विषयानुषंगे डॉ.ज्योती गाजरे यांनी मधुमेह म्हणजे काय ?, लक्षणे व उपाययोजना सांगितल्या. प्रत्येक वाढदिवसाला आरोग्य तपासणी केली पाहिजे. व्यायामाचीही शास्रोक्त माहिती दिली.

आमदार राजुमामा भोळे यांनी मार्गदर्शनात आईवडिलांना समजून घेणे समाजाची गरज आहे हे सोदाहरण सांगितले. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय झाल्यास ज्येष्ठांना शासकीय योजनांचा लाभ सर्वाथानं होईल. प्रत्येक तालुक्यात ,जिल्ह्यांत ज्येष्ठांसाठी निवारा असले पाहिजेत यासाठी पाठपुरावा शासनाकडे मी करायला कटीबद्ध असल्याचे सांगितले.

फेसकामचे माजी अध्यक्ष डी. टी. चौधरी यांनी मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरीक दिनाचा इतिहास  व स्थित्यंतरे सांगितली.  प्रांताधिकारी कामाच्या बोजामुळे ज्येष्ठांच्या समस्या निराकरणासाठी पुरेसा वेळ देत नाहीत याबाबत नाराजी व्यक्त केली.

या कार्यक्रमा दरम्यान ८७ वर्षीय डॉ. के. एम. दहाड यांचा सपत्नीक शाल स्मृतिचिन्हासह सत्कार करण्यात आला.  कुटूंबियांना प्रमाणपत्र आ. राजुमामा भोळे व अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविण महाजन याच्या हस्ते देण्यात आले. तसेच यावेळी  दिलीप लक्ष्मण बोंडे,  शकुंतला भागवत चौधरी यांचा सत्कार करण्यात आला.

संघटनेचा सत्कार – विवेकानंद प्रतिष्ठानच्या केशव स्मृती प्रतिष्ठान संचालित मातोश्री वृद्धाश्रम आश्रमाच्या उत्कृष्ट प्रसाधन व वृद्धांच्या सोयी सुविधां बद्दल व कर्तव्यतत्पर सेवेबद्दल  प्रकल्प संचालिका कांकरीया मॅडम व सहकार्यांनी पुरस्कार स्विकारला.

तृतीय पंथियांना ओळखपत्र वाटप

सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास होण्याच्या उद्दीष्टाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे ओळखपत्र माधुरी सिमाजान, दिपा जोगी आणि सहकार्यांना वितरीत करण्यात आले .

विशेष सत्कार

तृतीय पंथी ज्येष्ठ सिमाजान गुरु यांचा स्मृती चिन्ह व शाल देऊन विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

 

अध्यक्षीय मार्गदर्शनात अतिरीक्त जिल्हाधिकारी प्रविण महाजन म्हणाले की, “आईवडिलांचा त्याग लक्षात घेऊन जाणीवपूर्वक सेवा करा . त्यांच्या कामाची महती पुढच्या पिढीला दिली तर ज्येष्ठांची कुटुंबात होणारी हेळसांड टाळली जाईल. निर्वाह भत्ता कायदा व २०१० चे नियम त्यांनी थोडक्यात सांगीतले .

कार्यक्रमास चैतन्य ज्येष्ठ नागरीक संघ अध्यक्ष पी.आर.सोनार , महाराष्ट्र अंनिस राज्य पदाधिकारी डिगंबर कट्यारे , ज्येष्ठ नागरीक संघ,चोपडा अध्यक्ष विजय करोडोपती , खान्देश प्रादेशिक विभाग फेसकॉम अध्यक्ष जगतराव पाटील , ज्येष्ठ नागरीक संघ, रामानंद नगरअध्यक्ष  गुलाबराव बाविस्कर  ,  ज्येष्ठ साहित्यिका  विमल वाणी ,भारतरत्न डॉ.एपीजे.अब्दुल कलाम पुस्तक भिशी ,जळगाव संस्थापक जिल्हा प्रमुख  विजय लुल्हे , बाळकृष्ण वाणी, भादली बु॥ सरपंच अंजली पाटील आदी उपस्थित होते.

सहाय्यक आयुक्त योगेश पाटील प्रास्ताविक केले. यावेळी सर्व ज्येष्ठांचे गुलाब  पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.  सुत्रसंचालन संदेश ढगे व आभार  लेखाधिकारी मनिषा पाटील यांनी मानले.  कार्यक्रमास जिल्हाभरातून ज्येष्ठ चिरतरूण नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

Protected Content