अधिकार्‍यांनी माझ्या राजीनाम्याची सुपारी घेतली आहे का ? – आ. भोळे

aa.rajumama bhole

जळगाव प्रतिनिधी । शहरातून फिरतांना लाज वाटत असून अधिकार्‍यांनी माझ्या राजीनाम्याची सुपारी घेतली आहे का ? असा संतप्त प्रश्‍न आमदार राजूमामा भोळे यांनी विचारला आहे. ते नियोजन भवनातील बैठकीत बोलत होते.

जळगाव शहरातील अमृत योजनेच्या कामाची मुदत संपूनही काम अपूर्ण आहे. रस्त्यांची कामे न झाल्याने ५ लाख जळगावकर त्रस्त आहेत. या योजनेच्या कंत्राटदाराला अधिकारी पाठीशी का घालत आहेत. त्यांच्यावर राजकीय दबाव आहे काय व्यक्तीशी आम्हाला घेणंदेणं नाही. अशा या निष्काळजीपणाबद्दल कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून टर्मिनेट करा. मनपाच्या अधिकार्‍यांवरही कारवाई करण्याच्या सूचना खासदार उन्मेष पाटील व रक्षा खडसे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. त्यासाठी आठ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. मअधिकार्‍यांनी माझ्या राजीनाम्याची सुपारी घेतली असून, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक लोकप्रतिनिधींना पायी चालायला लावतात, त्याची अधिकार्‍यांना लाज वाटत नाहीफ, अशा शब्दात आमदार भोळे यांनीही अमृतच्या कामावरून संताप व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दिशा समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. याच्या अध्यक्षस्थानी खासदार रक्षा खडसे होत्या. तर याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार शिरीष चौधरी, सुरेश भोळे, लता सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील उपस्थित होते. खासदार पाटील व खडसे यांनी मनपाच्या अधिकार्‍यांकडून अमृत योजनेच्या कामाबाबत माहिती घेतली.

दरम्यान, आमदार राजूमामा भोळे यांनीही याप्रसंगी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. अधिकार्‍यांनी माझ्या राजीनाम्याची सुपारी घेतली आहे काय ? असा संतप्त सवाल करत ते म्हणाले की, अमृतच्या कामामुळे रस्त्यांची कामे झालेली नाहीत. नागरिकांनी लोकप्रतिनिधींना पायी चालायला लावले. आमचे तोंड काळे करण्याची भाषा नागरिक करीत आहेत. आम्हाला सर्व परिस्थितीला जबाबदार धरण्यात येत आहे. त्यामुळे कंत्राटदाराबरोबर अधिकार्‍यांवरही कारवाई करण्याची मागणी आमदार भोळे यांनी यावेळी केली. अमृतच्या पाइपलाइनसाठी खोदलेला रस्ता तयार करून देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. मात्र, त्यांनी रस्ते तयार करून दिले नसल्याचाही आरोप आमदारांनी केला.

Protected Content