जळगाव, प्रतिनिधी । शहरातील विविध भागात आज अतिक्रण निर्मूलन पथकाद्वारे कारवाई करण्यात आली. यावेळी गणेश कॉलनीत एका विक्रेत्याने चाकूने स्वतःच्या हातावर वार करून घेतल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, दोन दिवसांपासून अतिक्रण निर्मूलन पथकाने जवळपास ३ ट्रॅक्टर माल जप्त केला असून फुले मार्केटमधील एक दुकान सील करण्यात आले आहे.
अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे शहरातील विविध भागांत कारवाई करण्यात आली. आज शनिवार असल्याने कसमवाडी व काशीबाई उखाजी कोल्हे शाळेजवळ आठवडी बाजार भरला होता. हा बाजार देखील बंद करण्यात आला. मार्केटमधील दुकाने ३० जून पर्यत उघडण्यास मनाई असतांना फुले मार्केटमध्ये ‘मॉम अँड मी’ हे दुकान उघडे होते. ते सील करण्यात आले. दरम्यान, अतिक्रण निर्मूलन पथक गणेश कॉलनीत गेले असता तेथील हॉकर्स यांची पळ काढला. यानंतर हे हॉकर्स कुठे गेले यावर पाळत ठेवण्यात आली. पथकाने गणेश कॉलोनी येथून पुढे जाण्याचा देखावा केला. पथक पुढे गेले आहे असे समजताच हॉकर्स पुन्हा आपल्या मूळ जागी येऊन उभे राहिले. यानंतर पथक पुन्हा गणेश कॉलोनीत आल्याने हॉकर्सची धावपळ उडाली. पथकाने काही हॉकर्सचे माल जप्त करण्यास सुरुवात केली. याला एका हॉकर्सने विरोध करून पथकातील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. यात वाद वाढत जाऊन त्या हॉकर्सने स्वतः च्या हातावर भाजीपाला कापण्याच्या सुरीने वार करून घेतला. ही घटना घडल्यानंतर उपायुक्त संतोष वाहुळे यांनी त्या हॉकर्सला समजावून सांगितल्याने या प्रकारावर पडदा पडला.
पथकाने कालपासून १५०-२०० जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत जप्त केलेला नाशवंत माल हॉकर्सला परत केला जात असला तरी त्यांना हातगाडी परत मिळण्यासाठी ३० जूनची वाट पाहावी लागणार आहे. ही कारवाई उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश ठाकूर ,संजू पाटील,नाना कोळी,संजू परदेशी, संजू ठाकूर, वैभव धर्माधिकारी किशोर सोनवणे, राजू वाघ यांच्या पथकाने केली.