जळगाव प्रतिनिधी । पाळधी येथील इम्पेरियल स्कूलमधील स्रेहसंमेलन आटोपून मुलगी व भाच्यासह घरी परतणाऱ्या पाटील दाम्पत्याच्या दुचाकीला मागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात महिला दुचाकीवरून खाली कोसळताच धडक देणारे वाहन अंगावरून गेल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खोटेनगर परिसरातील वाटीका आश्रमाजवळ सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. गायत्री समाधान पाटील (२७, रा.वाणी गल्ली, पिंप्राळा) असे मयत महिलेच नाव आहे.तर समाधान पाटील, परी पाटील व रिदम असे तिघे जण जखमी झाले असून त्यांच्या खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.
पिंप्राळा येथील वाणी गल्लीमध्ये समाधान पाटील हे वास्तव्यास आहे़ कॉम्प्युटरीची कामे करून ते घराचा उदरनिर्वाह करतात़ मुलगी परी ही पाळधी येथील इम्पेरियल स्कूलमध्ये सिनीअर के़जी़मध्ये शिक्षण घेत आहे़ दरम्यान, शनिवारी शाळेमध्ये स्रेहसंमेलनाचा कार्यक्रम होता़ त्यामुळे समाधान पाटील हे पत्नी गायत्री, मुलगी परी व भाचा रिदम यांना दुचाकीने घेवून इम्पेरियल स्कूलमध्ये स्रेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला गेले होते़ सायंकाळी कार्यक्रम झाल्यानंतर चौघे दुचाकीने घरी येण्यासाठी निघाले़
मागून दिली जोरदार धडक
दरम्यान, खोटेनगर परिसरातील वाटीका आश्रमसमोरील महामार्गावरून जात असताना मागून भरधाव येणाºया अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली़ धडक एवढी जबर होती की, गायत्री या दुचाकीच्या खाली कोसळल्या आणि क्षणात धडक देणारे वाहन त्यांच्या अंगावरून गेले़ त्यामुळे गायत्री यांचा जागीच मृत्यू झाला़ तर समाधान, परी आणि रिदम हे तिघे जखमी झाले़
जखमींना रूग्णालात हलविले
अपघातानंतर धडक देणारे वाहन घटनास्थळावरून पसार झाले होते तर दुसरीकडे महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघात झाल्याचे कळाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दखल केले तर मयत महिलेस जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले होते. तर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. जखमी समाधान यांच्या पायाला तसेच हाताला व त्यांचा भाचा रिदम याच्या देखील पायाला दुखातप झाली असून दोघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
ग्रामस्थांची रूग्णालयात गर्दी
अपघाताची माहिती मिळताच पिंप्राळा येथील ग्रामस्थ तसेच जखमी समाधान यांचे मित्र मंडळींनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली़ त्यामुळे एकच गर्दी रूग्णालयात झाली होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत नातेवाईकांसह मित्रमंडळी व ग्रामस्थांची जिल्हा रूग्णालयात गर्दी होती.