अजित पवारांसारखेच राज ठाकरे यांचेही मुतण्याचा संदर्भ देत उदाहरण !

 

पुणे : वृत्तसंस्था । काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राला दुष्काळानं प्रचंड ग्रासलं असताना अजित पवारांनी ‘आता धरणात मुतायचं का?’, असे उद्गार काढून रोष ओढवून घेतला होता. चारचौघात प्रत्येकाच्या तोंडात येणारे शब्द सार्वजनिक व्यासपीठावर बोलत नाहीत, हा संकेत अजित पवारांनी पाळला नाही. आता पवारांच्या पंक्तीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही बसले आहेत.

पवार बोलले तेव्हा महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा संदर्भ होता, तर आज राज ठाकरे बोलले त्यामागे पूराचा संदर्भ आहे. आपली शहरं कशी नियोजनशून्य आहेत हे पोटतिडिकीनं सांगताना राज ठाकरे पत्रकार परिषदेत बोलून गेले की, “तीस चाळीस लोकं मुतली तरी पूर येईल असं आपल्या शहरांचं नियोजन आहे.” त्यांचा सगळा भर होता, हे सांगण्यावर की शहरांमध्ये मिळेल त्या जागांवर इमारती बांधून, सांडपाण्याचा निचरा करण्याची सोय न करून शहरं बकाल केली आहेत. जरा जरी जास्त पाऊस पडला तरी निचऱ्याअभावी पूरासारखी स्थिती होते, असं राज यांना अधोरेखित करायचं होतं. पण अजित पवारांप्रमाणेच स्पष्ट शब्दांमध्ये आपली मतं मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज ठाकरेंनीही हा मुद्दा मांडण्यासाठी आधार घेतला मुतणे या शब्दाचा.

केवळ शहर नियोजनच नाही तर एका राजकीय प्रश्नासंदर्भात बोलतानाही राज यांनी पुन्हा मुतणे या शब्दाचा वापर केला. राज यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात मांडलेल्या भूमिकेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना राज यांनी, “माझ्या भूमिका स्पष्ट असतात,” असं सांगितलं. मात्र पुढे बोलताना त्यांनी आपण वाटेल तसं, मनात येईल ते बोलत नाही असं सांगण्यासाठी, “बैल मुतल्या सारखा मी बोलत नाही,” हे वाक्य वापरलं. “मी चालता चालता काही बोलत नाही. चांगला निर्णय घेतला तर मी अभिनंदन केलं आहे आणि करत आलोय. माझा व्यक्तीला विरोध नसून धोरणाला विरोध आहे,” असं भाजपासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे म्हणाले.

Protected Content