अखेर न्याय मिळाला- निर्भयाच्या आईची भावना !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आपल्या मुलीच्या मारेकर्‍यांना फाशी मिळाल्यानंतर आज खरा न्याय मिळाल्याची भावना निर्भयाच्या आईने व्यक्त केली आहे.

आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास निर्भयावर अत्याचार करून तिची अतिशय क्रूरपणे हत्या करणार्‍या मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह या चौघा सैतानांना फासावर लटकावण्यात आले. यानंतर निर्भयाच्या आईने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, निर्भयाला मी वाचवू शकले नाही याचं मला वाईट वाटतं आहे. दुःखही होतं आहे मात्र तिला न्याय मिळाला याचं मला समाधान आहे. इतकंच नाही तर निर्भयाची आई ही मला मिळालेली ओळख अभिमानास्पद आहे. फाशीची प्रक्रिया पूर्ण झाल्या झाल्या मी निर्भयाच्या फोटोसमोर गेले. त्या फोटोला मिठी मारली. आज निर्भया असती तर तिला जशी मिठी मारली असती अगदी तशीच मिठी मी तिच्या फोटोला मारली. तिला वाचवू शकले नाही याचं वाईट वाटतं आहे. दोषींना आज फासावर लटकवण्यात आलं हे चांगलंच झालं. मात्र न्याय मिळण्यासाठी उशीर लागला त्याबाबत खंत वाटते. यापुढे २० मार्च हा दिवस निर्भया दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. आजच्या दिवशी निर्भयाचाच विजय झालेला नाही तर तिच्यासाठी संघर्ष करणार्‍या प्रत्येकाचा विजय झाला आहे असंही निर्भयाच्या आईने म्हटलं आहे.

Protected Content