अक्कलकोट येथे ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन

सोलापूर प्रतिनिधी । अक्कलकोट येथे महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे ५५ वे वार्षिक अधिवेशन २ व ३ फेब्रुवारी रोजी येथे होणार असल्याची माहिती श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयाच्या अध्यक्ष शैलशिल्पा जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दोन फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता श्रीमंत शहाजी राजे भोसले वाचनालयापासून भक्त निवासापर्यंत ग्रंथदिडी निघणार आहे. कुंडलिक मोरे यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्षस्थानी शिवराज म्हेत्रे असतील. दुपारी चार वाजता वाचन संस्कृती वाढवणे ही काळाची गरज या विषयावरील चर्चासत्रात नंदा जाधव (सातारा), सुप्रिया किरनाळे (सोलापूर), स्वमीनाथ हरवाळकर, आरती काळे, प्राचार्य उमाकांत चनशेट्टी (अक्कलकोट) सहभागी होतील. सायंकाळी सहा वाजता ग्रंथालयासमोरील आव्हाने या परिसंवादात भगवान शिंदे (पुणे), अण्णा धुमाळ (नाशिक), श्रीराम देशपांडे (अमरावती), श्रीकृष्ण साबणे (कोकण), भास्कर पिंपळकर ( मराठवाडा), अरुण बोरगमवार (नागपूर) यांचा सहभाग असेल.

तीन फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता ग्रंथप्रदर्शनाचे अ‍ॅड. बी. एस. पाटील, अरुणा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दुपारी तीन वाजता ग्रंथालय कर्मचारी यांच्या समस्या या विषयावर राज्य कृती समितीचे अध्यक्ष राजकुमार हंचाटे (सोलापूर) रवींद्र कामत (कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन होणार आहे. चार वाजता ग्रंथालय संचालक यांची प्रकट मुलाखत होईल. सायंकाळी पाच वाजता खुल्या अधिवेशनाने समारोप होणार आहे. हे अधिवेशन श्री स्वामी समर्थ देवस्थानच्या स्व. बाळासाहेब इंगळे पॉलिटेक्निक कॉलेजच्या सभागृहात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Add Comment

Protected Content