मुंबई : वृत्तसंस्था । उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर तपास सुरु असतानाच गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाणे येथील मुंब्रा येथे सापडला असल्याचं विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
रेतीबंदर येथे हा मृतदेह सापडला असून यामागे काहीतरी गौडबंगाल दिसत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याचं सांगितलं आहे.
तपासात मनसुख हिरेन सर्वात महत्वाचा दुवा आहे, जे या गाडीचे मालक आहेत. त्यांना तात्काळ सुरक्षा दिली पाहिजे अशी मागणी केली असतानाच त्यांचा मृतदेह मुंब्र्याच्या जवळ सापडला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हे प्रकरण फक्त गंभीर नाही तर अत्यंत गुंतागुंतीचं आणि आव्हानात्मक झालं आहे. हे जे काही योगायोग आहेत त्यातून संशय निर्माण झाले आहेत. महत्वाच्या प्रकरणातील इतक्या महत्वाच्या साक्षीदाराचा मृतदेह मिळते, यामागे गौडबंगाल असल्याचं दिसत आहे. त्यामुळे तात्काळ हे प्रकरण एनआयकडे वर्ग केलं पाहिजे आणि सत्य समोर आलं पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
“इतकी माहिती जर माझ्याकडे येऊ शकते तर ती गृहमंत्र्यांकडे जाणार नाही असं मला वाटत नाही. त्यामुळे गृहमंत्री याबाबत स्पष्ट भूमिका का मांडत नाहीत हा प्रश्न आहे. सोबतच इतकी माहिती बाहेर आल्यानंतरही प्रकरण एनआयएकडे देणार की नाही हादेखील महत्वाचा प्रश्न आहे,” असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. “चौकशी सुरु असतानाच इतक्या महत्वाच्या साक्षीदाराचा मृतदेह सापडणं याचा अर्थ याला वेगळ्या तपासाची गरज आहे,” असं मत त्यांनी नोंदवलं.
“मनसुख हिरेन यांच्या व्हॉट्सअप कॉलची चौकशी केला पाहिजे. त्यामधून अनेक गोष्टी बाहेर येतील. मी राज्याला विनंती केली असून केंद्रालाही करणार आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.
ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांनी कळवा खाडीत उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली असून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक गाडी सापडली. हा घटनाक्रम संशय निर्माण करणारा आहे. वाहन सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार झाला आणि त्यावर एक पत्र आले ‘जैश उल हिंद‘ नावाने. एक क्रिप्टो करंसी अकाऊंट दिले होते. पण तसे कुठले खातेच नव्हते,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी धमकीचं पत्र वाचून दाखवत सांगितलं की, “यामधून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही एकच गाडी तिथे आली नव्हती, त्या ठिकाणी दोन गाड्या आल्या होत्या. या दोन्ही गाड्या एकाच मार्गाने आल्या असून ठाण्यातूनच आल्या आहेत. गाडी ओळखल्याबरोबर पोलीस अधिकारी सचिन वाझे पहिल्यांदा पोहोचले. कोणीही पोहोचण्याआधी ते पोहोचले नंतर क्राइमचे, स्थानिक पोलीस ठाण्याचे आणि इतर लोक आले. नंतर सचिन वाझे यांनी तपास अधिकारी म्हणून नेमण्यात आलं. तीन दिवसांपूर्वी एका एसीपीला तपास अधिकारी म्हणून नेमलं असून, सचिन वाझेंना का काढलं? हे समजलं नाही”.
पुढे ते म्हणाले की, “योगायोग म्हणजे ज्यांची गाडी चोरीला गेली, त्यांच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद झाला आहे. सचिन वाझे यांचा तो नंबर असल्याचं समोर आलं आहे. ज्या दिवशी गाडी ठाण्याला बंद पडली, त्यानंतर ओला घेऊन तो कॉफर्ड मार्केटला गेला. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण हा माझा प्रश्न आहे. कोणाला तो भेटला, हे जर काढलं तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील”.
“ज्या ओलामध्ये बसून गेला त्याचं रेकॉर्ड आहे. तो कोणाला भेटला हे ओला कॅब चालकाने पाहिलं आहे. अशा परिस्थितीत वाझे ठाण्यातील, गाडी ठाण्यातील आणि या दोघांचे आधीपासून संवाद हे खूपच योगायोग असून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गाडी दिसल्याबरोबर वाझे तिथे पोहोचले. धमकीचं पत्रही सचिन वाझे यांना प्राप्त झालं. त्यांनीच ते टेलीग्रामवर टाकलं. शंकेला वाव देणारे बरेच पुरावे आहेत. त्यामुळे ही संपूर्ण चौकशी एनआयएला द्यावी, अशी आमची मागणी आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.