सोलापूर : वृत्तसंस्था । राज्यात लॉकडाउन असताना सोलापुरात सामाजिक कार्यकर्त्याच्या अंत्यदर्शनासाठी तुफान गर्दी उसळली होती. गर्दी पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. यानंतर पोलिसांनी २०० लोकांवर गुन्हा दाखल करून ४५ जणांना अटक केली आहे
सोलापुरातील लष्कर भागातील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या निधनानंतर अंत्यदर्शनसाठी ही गर्दी जमली होती. पोलिसांनी यानंतर करण म्हेत्रे यांच्या घराचा एक किमीचा परिसर सील केला आहे. ४५ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांची चाचणी केल्यानंतर एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळला आहे.
आपत्ती व्यवस्थापन नियमांचा भंग केल्यामुळे पोलिसांनी २०० हून अधिक जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील ४५ जणांना अटक करून रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. यादरम्यान त्यांच्यातील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला.कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी करण म्हेत्रे यांच्या सोलापुरातील घराचा एक किमीचा परिसर बॅरिकेट्स लावून सील केला आहे.
यामध्ये लष्कर, सरस्वती चौक, ताशकंद चौक, शास्त्री नगर, सिद्धार्थ चौक, अलकुंटे चौकाचा समावेश आहे. पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान हीच तत्परता पोलीस आणि महापालिका प्रशासनाने आधी दाखवायला हवी होती अशी चर्चा आहे.