मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, व्यवसायिक/बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाच्या/शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे.
कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रातील वाढता संसर्ग आणि धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मार्च महिन्यात दहावी-बारावीचे शेवटचे पेपर स्थगित करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात ट्वीट करून माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांना विद्यापीठानं ठरवलेल्या सुत्रानुसार पदवी देण्यात येणार आहे.