धरणगाव, प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यांनी कुलगुरुंकडे ऑनलाईन बैठकीत केली असल्याचे व्यवस्थापन सदस्य दिलीप रामू पाटील यांनी कळविले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठांना परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विद्यापीठाने तयारी सुरू केले आहे. पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने हिताचे आहे म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षांचे आयोजन करावे. परीक्षा न घेता दिलेली पदवी घेऊन हे विद्यार्थी पुढील शिक्षण किंवा नोकरीसाठी गेले तर त्यांना अडचण येऊ शकते. आपल्या विद्यापीठ क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना रोजगारासाठी बाहेर जावे लागते. त्यावेळी त्यांना येणारी अडचण लक्षात घेता अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठाने घ्याव्यात. परीक्षा घेतांना सर्व प्रकारची योग्य ती काळजी आपल्या क्षेत्रातील संस्थाचालक प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी त्यांचे पालक विद्यापिठाची सर्व प्राधिकरणावर सदस्य सामूहिकपणे घेतील. त्यासाठी आवश्यकता मार्गदर्शक सूचना विद्यापीठांनी त्यात पण परीक्षा घेणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचे आहे. परीक्षा घेताना अडचणी येतील पण अडचणींवर मात करून यशस्वी मार्ग काढण्यासाठी आपल्याकडील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटक तत्पर असतात. त्यामुळे या परीक्षा घ्याव्यात अशी मागणी व्यवस्थापन परिषद सदस्यांच्या ऑनलाइन झालेल्या बैठकीत करण्यात आली. बैठकीत व्यवस्थापन सदस्य डॉ. प्रीती अग्रवाल, प्राचार्य एल. पी. देशमुख, प्रा. मोहन पावरा, विवेक लोहार, प्रा. नितीन बारी, प्रा. जे. पी. नाईक, डॉ. प्रशांत कोडगिरे इंदोर, दिलीप रामू पाटील व दिपक पाटील यांचे भाग घेतला. विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध महाविद्यालयांच्या युनिट स्वयंसेवकांकडून कोरोना संदर्भात होत असलेल्या कामगिरीबद्दल व विविध महाविद्यालयीन शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी आयोजित केलेल्या वेबीनाॅर बद्दल बैठकीत अभिनंदन करण्यात आले. निवेदन कुलगुरूंना इमेलद्वारे पाठविण्यात आले.