संतांचा अपमान करणाऱ्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही.

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रात येऊन जर संत तुकाराम महाराज यांचा कोणी अपमान करत असेल तर ते अजिबात चालणार नाही. संतांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.

 

 

यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपा किती सत्तापिपासू आहे याचा अंतच नाही, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडताना सुरतेपासून गुवाहाटी पर्यंत काय-काय झाले, राज्यपालांनी पदाचा कसा दुरुपयोग केला, या सर्व घटना आपण सर्वांनी पाहिलेल्या आहेत. सुनावणीदरम्यान न्यायाधिशांनी जे काही प्रश्न विचारले, निरीक्षणे नोंदवली यावर त्यांना ट्रोल केले गेले, हा ट्रोल करण्याचा प्रकार गंभीर आहे. केंद्रातील सरकारवर कोणाचाच विश्वासच राहिलेला नाही म्हणूनच राष्ट्रपतींकडे दाद मागण्यासाठी काँग्रेस खासदार गेले आहेत.

 

सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल यावर भाष्य करणे योग्य नाही परंतु मंत्रालयात लगबग सुरु झाली असल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे त्यांना काहीतरी चाहुल लागली आहे असे वाटते. साधारणतः सरकारचा कालावधी संपताना किंवा सरकार जाऊ शकते अशी वेळ येते त्यावेळी अशी लगबग सुरु असते. आम्ही सर्वोच्च न्यायलयातील निकालाची वाट पहात आहोत, असा टोला पटोले यांनी लगावला.

 

 

 

धीरेंद्र शास्त्री या बाबाचा मीरा रोड येथे कार्यक्रम होत आहे, त्यानी काय प्रवचन करावे हा त्यांचा अधिकार आहे. परंतु या व्यक्तीने जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल अपमान करणारे विधान करुनही शिंदे सरकार त्यावर कारवाई का करत नाही? असा आमचा सवाल आहे. आम्हाला आमचे संत महत्वाचे आहेत, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. संतांना आपल्या जिवनात महत्वाचे स्थान आहे. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाची सुरुवातही संत तुकाराम महाराज यांच्या अभंगानेच केली. संतांच्या विचारात मोठी ताकद आहे. भ्रष्ट विचाराचे कोणी स्वतःलाच संत म्हणून घेत असेल तर ते बरोबर नाही. आमच्यासाठी संत तुकाराम महाराज हे सर्वश्रेष्ठ आहेत. महाराष्ट्रात येऊन जर संत तुकाराम महाराज यांचा कोणी अपमान करत असेल तर ते अजिबात चालणार नाही. संतांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशाराही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिला.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content