.विद्यापीठात “शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स”च्या बॅनरचे विमोचन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतील जनजागृतीचा एक भाग म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्सच्या बॅनरचे विमोचन गुरूवार १८ मे रोजी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, नोडल ऑफिसर प्रा. संदिप भामरे, कक्षाधिकारी राजेश ठाकरे आदी उपस्थित होते. शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स हे आभासी/डिजिटल स्टोअर हाऊस असून ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक शिक्षण प्रवासात प्राप्त झालेल्या क्रेडिट्सची माहिती जमा होते.

 

यामध्ये प्रत्येक नोंदणीधारक विद्यार्थ्याच्या डेटाचे रेकॉर्ड ठेवले जाते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्सबाबत जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांनी तातडीने नोंदणी करावी. यासाठी जनजागृती केली जात आहे. विद्यापीठाच्यावतीने त्यासाठी बॅनर/पोस्टर्स तयार करण्यात आले आहेत. महाविद्यालयांना देखील मेलव्दारे मजकूर पाठवण्यात आला आहे. ज्या ठिकाणी विद्यार्थी अधिक संख्येने असतात त्या ठिकाणी प्रथमदर्शनी ते बॅनर लावण्याच्या सुचना विद्यापीठाने दिल्या आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आतापर्यंत या शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स अंतर्गत १ लाख २३ हजार ४०० विद्यार्थ्यांचे आयडी तयार केले आहेत. याशिवाय ५४ हजार २२२ विद्यार्थ्यांचा मार्कशीट क्रेडिट्स डेटा देखील अपलोड करण्यात आला आहे. अशी माहिती शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्सचे नोडल ऑफिसर प्रा. संदिप भामरे यांनी दिली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content