रिक्षात प्रवाशी भरण्याच्या कारणावरून चालकाला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा भरण्याच्या कारणावरुन सात जणांनी रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार, २१ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील मढी चौक येथे निलेश चंद्रकांत ठाकूर हे वास्तव्यास आहेत. ते रिक्षाचालक असून रेल्वेस्थानकावर रिक्षा लावून प्रवासी वाहतूक करतात. मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास निलेश ठाकूर हे नेहमीप्रमाणे त्यांच्या रिक्षात प्रवासी भरत असतांना, यावरुन त्यांच्याशी तौसिफ शेख शकील अहमद व ओसामा शेख अब्दुल सत्तार या दोघांनी वाद घातला. याचकारणावरुन तौसिफ, ओसामा या दोघांवसह आणखी पाच जणांनी निलेश ठाकूर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तोंडावर तसेच पोटावर मारहाण केली. या मारहाणीत निलेश ठाकूर हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी निलेश ठाकूर यांनी दुसऱ्या दिवशी बुधवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन तौसिफ शेख शकील अहमद  व ओसामा शेख अब्दुल सत्तार दोन्ही रा. शाहूनगर याच्यासह इतर पाच अनोळखी व्यक्ती अशा सात जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय बडगुजर हे करीत आहेत.

Protected Content