रस्ता तयार करा, अन्यथा आंदोलन करणार ! : पहूरपेठ ग्रामपंचायतीचा इशारा

पहूर , ता . जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महामार्गावरील कामामुळे तयार करण्यात आलेला चढण रस्ता हा तातडीने दुरूस्त करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील ग्रामपंचायतीने प्रशासनाला दिला आहे.

 

जळगाव -छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाअंतर्गत वाघुर नदी वरील पुलाचे काम सुरू आहे . मात्र यामुळे बसस्थानकावरून  पहूर पेठ गावात जाणारा मुख्य रस्ता अतिशय निमुळता झाला आहे . या रस्त्याची चढण जीव घेणी झाली आहे. काही दिवसांपूर्वी या ठिकाणी बस अपघातात हात गाडीवर पोट भरणार्‍या मजुराचा मृत्यू झाला आहे. रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने तसेच रस्ता अरुंद व अतिशय चढण, उतारचा असल्यामुळे रस्त्याचा श्वास गुदमरतो आहे. यामुळे गावात येणार्‍या – जाणार्‍या  नागरिकांसाठी चढण रस्त्यावरून जाताना अक्षरशः जीव मुठीत धरुन तारेवरची कसरत करावी लागत आहे .

 

 

यामुळे  रस्ता त्वरित वाहतुकीसाठी सुरक्षितरित्या तयार करावा , गावातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या अगोदर संबंधित अधिकार्‍यांनी याकडे लक्ष द्यावे , या मागणीचे निवेदन गृप ग्रामपंचायत पहूर पेठ – सांगवी -खर्चाणे येथील ग्रामविकास अधिकार्‍यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जालना विभाग यांच्या कडे  लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यात पहूर पेठ गावात जाणारा मुख्य रस्ता त्वरित करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा  देण्यात आला आहे.

 

या निवेदनाच्या प्रती राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन , पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील , जिल्हाधिकारी अमन मित्तल, तहसीलदार जामनेर  यांना सादर करण्यात आल्या आहेत.

Protected Content