महिला वकीलाच्या खून प्रकरणी पतीस पोलीस कोठडी

जामनेर प्रतिनिधी । सरकारी महिला वकील विद्या पाटील यांच्या खून प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी पतीस जामनेर न्यायालयाने दि.२० जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.

पतीची कबुली

जामनेर येथील रहिवाशी व जळगाव जिल्हा न्यायालयात सरकारी वकील म्हणून कार्यरत असलेल्या महिला वकील राखी ऊर्फ विद्या भरत पाटील (वय-३७) या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी मयत वकील महिलेचा पती डॉ.भरत लालसिंग पाटील याला गजाआड केले आहे. त्याने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केली असल्याच्या कबुली जबाबावरून पोलिसांनी डॉ.भरत पाटील याला अटक केली आहे. दरम्यान, आज सकाळी जामनेर न्यायालयात हजर केले असता न्यायमूर्ती-कुलकर्णी यांनी आरोपीला दि.२० जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. आरोपीस न्यायालयात हजर केले असता सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. कृतिका भट व अ‍ॅड. अनिल सारस्वत यांनी काम पाहिले.

वकीलपत्र न घेण्याचा वकील संघाचा ठराव

वकील संघाच्या सदस्य महिला सरकारी वकील (राखी) विद्या भरत पाटील यांच्या मृत्यू प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉ.भरत पाटील याचा संपूर्ण जिल्ह्यातील न्यायालयीन क्षेत्रातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. जामनेर न्यायालयातही या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. तसेच तालुका वकील संघाच्या वतीने आरोपी डॉ.भरत पाटील यासह जे-जे कोणी महिला सरकारी वकीलाच्या हत्येस जबाबदार असतील त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी कोणीही आरोपीचे वकीलपत्र घेऊ नये, असा ठराव संमत करण्यात आला. दरम्यान, फॉरेन्सिक लँबच्या पथकाने येवून घटना घडली त्या घराची पाहणी करून आवश्यक पुराव्यांची पडताळणी केली.

Add Comment

Protected Content