यावल प्रतिनिधी । गुरूवारी सकाळी यावल येथील पेट्रोलपंपावरील दरोड्या संदर्भातील व्हिडीओवरून दोघांकडून तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना आज सकाळी शहरातील संभाजी पेठ परीसरात घडली. याप्रकरणी यावल पोलीसात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, यावल येथील पेट्रोल पंपावर सात ते आठ दरोडेखोरांचा व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ यावल शहरात चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान, आज सकाळी १० वाजेच्या सुमारास संभाजी पेठ परीसरात मिरचीच्या दुकानावर एक तरूण मिरची घेण्यासाठी आला होता. त्यावेळी दुकानासमोर बसलेले दोन भावंडांनी मोबाईलवर व्हिडीओ बघत असतांना त्याला चितावत व खून्नस दाखवत तरूणाकडे बघून दरोड्यातील काही आरोपी तुमच्या समाजातील असल्याचा बोलले. याचा राग येवून तरूणाने दोघी भावंडांना शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर दोन्ही भावांनी तरूणाला बेदम मारहाण करत जखमी केले. यात तरूण गंभीर जखमी झाला. यावल ग्रामीण रूग्णालयात तरूणावर उपचार करण्यात आले. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांनी दोघांची बाजू ऐकुण घेत परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.