एमआयडीसी पोलीस निरीक्षकांची उचलबांगडी; मुख्यालयात तडकाफडकी बदली

जळगाव प्रतिनिधी | लॉकडाऊनमध्ये दारू विक्रीप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांची आज पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी तडकाफडकी उचलबांगडी केली आहे. रणजित शिरसाठ यांची मुख्यालयात बदली झाली असून, एमआयडीसी पोलिस ठाण्याचा पदभार तात्पुरत्या काळासाठी शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील आर.के. वाईन्स शॉपमधून लॉकडाऊनच्या काळात मद्याची तस्करी सुरू होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास दुकानात छापा टाकून मद्यविक्रीचा डाव हाणून पाडला होता. याप्रकरणी प्राथमिक तपासात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर यात गुन्ह्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आलेत. यात एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस नाईक जीवन पाटील, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे नाईक संजय जाधव, मुख्यालयातील पोलिस नाईक मनोज सुरवाडे व तालुका पोलिस ठाण्याचे पोहेकॉ भारत पाटील यांचा देखील बेकायदेशीर दारूविक्रीत सहभाग असल्याचे समोर आले होते. दरम्यान या गुन्ह्याची चौकशी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्यानंतर पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ आणि चारही पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रणजित शिरसाठ यांची पोलीस अधिक्षकांनी उचलबांगडी करत पोलीस मुख्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले.

Protected Content