जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । आजपासून सर्वत्र शाळा सुरू झाल्या असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची घोड्यावरून, ट्रॅक्टरवर, बैलगाडीवर, ऑटो रिक्षामधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
इयत्ता पहिलीतील सर्व मुलांचे बुके आणि फुगे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. आणि एकेका मुलाला घोड्यावर बसवून त्यामागे ट्रॅक्टर, बैलगाडी आणि ऑटो रिक्षा मध्ये बसून सर्व विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
या निमित्त विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवू छान, मुलामुलींना, शाळेत पाठवा, सब पढे, आगे बढे, एक-दोन-तीन-चार जिल्हा परिषदेची शाळा छान अशाप्रकारे घोषणा दिल्या. सर्व पालकांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच मुलांना शिक्षण घ्यावे. मातृभाषा हीच मुलाची शिक्षणाची खरी भाषा आहे. मातृभाषेतूनच मुलांना शिक्षण दिले गेले पाहिजे अशी भावना पालकांनी व्यक्त केली. मिरवणूक झाल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
त्यानंतर सर्व मुली, अनुसूचित जाती, जमातीचे मुले आणि बीपीएल कार्ड धारक मुले यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी सरपंच सौ नीता किरण जाधव, माया कोल्हे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कांचन भाऊ परदेशी, बन्सीलाल पाटील, माया कोल्हे, चारुलता कोल्हे पूजा चौधरी प्रशांत ढाके, शाळेचे मुख्याध्यापक भगवान बडगुजर उपशिक्षक मीनाक्षी पाटील प्रीती फेगडे आणि समाधान जाधव सर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समाधान जाधव यांनी केले.
मिरवणुकीसाठी घोडा संदीप सपकाळे यांनी दिला. मिरवणुकीसाठी ट्रॅक्टर शरद ढाके आणि वीरेंद्र कोल्हे यांनी दिले. ऑटो रिक्षा कांचन परदेशी यांनी दिली. बैलगाडी विलास पाटील, किशोर परदेशी यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सर्व गावकरी यांनी मदत करणाऱ्या ग्रामस्थांचे अभिनंदन आणि कौतुक केले. जागोजागी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. शिक्षकांचे स्वागत करून अनोख्या उपक्रमाबद्दल सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन केले.
शाळेच्या पहिल्या दिवशी योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत, साफसफाई, पुस्तक वाटप, गणवेश वाटप केली जात आहे की नाही यासाठी पंचायत समिती भुसावळ येथील कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी अमोल आराक यांची शाळा तपासणीसाठी नेमणूक केली होती. अमोल आराक यांनी शाळेला देऊन भेट दिली. आराक यांनी शाळेतील शैक्षणिक वातावरण पाहून, विद्यार्थ्यांची मिरवणूक पाहून आनंद व्यक्त केला.