Home Cities जळगाव जिल्हा परिषद सीईओ करिश्मा नायर यांची कानळदा गावात अचानक धडक 

जिल्हा परिषद सीईओ करिश्मा नायर यांची कानळदा गावात अचानक धडक 

0
141


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी सोमवार, दि. २० एप्रिल २०२६ रोजी जळगाव तालुक्यातील कानळदा गावाला अचानक भेट देत तेथील शासकीय यंत्रणेचा सखोल आढावा घेतला. या अचानक भेटीमुळे स्थानिक प्रशासनात खळबळ उडाली असून विविध विभागांच्या कामकाजाची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर करिश्मा नायर यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय संस्था आणि विभागांना प्रत्यक्ष भेटी देऊन कार्यपद्धतीचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी कानळदा गावात कोणतीही पूर्वसूचना न देता भेट देत आरोग्य, शिक्षण आणि ग्रामविकास यंत्रणेची कार्यस्थिती जाणून घेतली.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाहणीदरम्यान त्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या सेवा, औषधसाठा, स्वच्छता व्यवस्था तसेच कर्मचारी उपस्थितीची सखोल तपासणी केली. नागरिकांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा मिळणे ही प्राथमिक जबाबदारी असून त्यात कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. आरोग्य केंद्रातील त्रुटींवर तातडीने उपाययोजना करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.

यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी शिक्षण गुणवत्ता, उपस्थिती, पोषण आहार आणि शैक्षणिक साहित्याची उपलब्धता याचीही पाहणी केली. मुलांना सुरक्षित व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

ग्रामपंचायत कार्यालयाच्या भेटीदरम्यान करिश्मा नायर यांनी सरपंच, ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांशी चर्चा करत विविध विकासकामांचा आढावा घेतला. कार्यालयातील दप्तर, अभिलेख आणि प्रशासकीय नोंदींची तपासणी करून ग्रामविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्याचे त्यांनी सांगितले. कामकाजात गती आणि पारदर्शकता ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले.


Protected Content

Play sound