मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक योग दिनानिमित्त घोडसगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागृती निर्माण करत उत्साहात योग सत्राचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक व मानसिक स्वास्थ्याचा संदेश पोहोचवणारा हा कार्यक्रम उपस्थितांची मन जिंकून गेला.
विद्यार्थ्यांना दिले योगाचे प्रात्यक्षिक आणि मार्गदर्शन
या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाचे महत्त्व समजावून सांगत रोजच्या जीवनात योगाचा समावेश का गरजेचा आहे, हे सहज भाषेत पटवून दिले. त्यानंतर शिक्षक सोमनाथ गोंडगिरे यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली. विद्यार्थ्यांनीही पूर्ण उत्साहाने सहभाग घेत योगासने केली.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य प्रफुल जवरे, पालक रमेश भलभले, विलास टोंगळे, अनिल इंगळे, केंद्रप्रमुख विजय दुट्टे यांच्यासह आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत मांडले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक अनिल पवार, शिक्षक भिका जावरे, सोमनाथ गोंडगिरे, गोपाल दूतोंडे आणि स्वाती भंगाळे यांनी परिश्रम घेतले. त्यांचे नियोजन आणि सहकार्यामुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध आणि प्रभावी झाला.
संपूर्ण शाळेच्या परिसरात एक सकारात्मक ऊर्जा पसरली होती. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या मार्गदर्शनातून योगाचे मोल आणि नियमित सरावाचे महत्त्व समजून घेतले.