पाचोरा -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांनी देखील बंडखोरी केल्याने त्यांचे काका स्व. आर. ओ. (तात्या) पाटील यांची कन्या वैशाली सुर्यवंशी यांनी उद्धव ठाकरे यांच्या मुळ शिवसेनेची धुरा हाती घेतली आहे. या निमित्ताने माजी पर्यटनमंत्री तथा युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे हे दि. २० ऑगस्ट रोजी शनिवारी पाचोरा येथे शिवसंवाद यात्रेसाठी दुपारी १२ वाजता येत आहेत.
दरम्यान, राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० आमदार फोडुन बंडखोरी केल्यानंतर ज्या – ज्या मतदार संघातील आमदारांनी बंडखोरी केली. त्या – त्या मतदार संघात शिवसंवाद यात्रेद्वारे बंडखोर आमदाराच्या मतदार संघात जावुन शिवसंवाद साधत आहे.
आदित्य ठाकरे यांचे सोबत शिवसेनेचे उपनेते गुलाबराव वाघ, जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपुत, अॅड. हर्षल माने, विष्णु भंगाळै, महापौर जयश्री महाजन, उप महापौर कुलभूषण पाटील, शरद तायडे, विधानसभा संपर्क प्रमुख सुनिल पाटील हे उपस्थित राहणार आहे. अशी माहिती शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील “शिवतीर्थ” या शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत वैशाली सुर्यवंशी यांनी दिली. यावेळी उपजिल्हाप्रमुख अॅड. अभय पाटील, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, माजी जि. प. सदस्य उद्धव मराठे, राजेंद्र साळुंखे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफन, नाना वाघ उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांचे दि. २० रोजी सकाळी ११ वाजता जळगांव येथे आगमन झाल्यानंतर सामनेर, लासगाव, नांद्रा, हडसन, खेडगाव (नंदीचे), बिल्दी, गोराडखेडा येथील स्थानिक शिवसैनिक स्वागत करतील व मोठ्या संख्येने महिला औक्षण करणार असुन सामनेर येथुन ५०० मोटरसायकलची रॅली वरखेडी नाक्या पर्यंत आल्यानंतर त्याठिकाणी तालुक्यातुन व शहरातुन पुन्हा ५०० मोटरसायकल रॅलीत सामिल झाल्यानंतर ते मोठ्या ताफ्यासह भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात आल्यानंतर महाराणा प्रताप महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करुन व हुतात्मा स्मारकास भेट दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील “शिवतीर्थ” या शिवसेना कार्यालयाजवळ लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवसैनिकांशी शिवसंवाद साधणार आहेत. पाचोरा मतदार संघातील शिवसैनिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शिवसंवाद यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन वैशाली सुर्यवंशी यांनी केले आहे.