जळगाव, प्रतिनिधी | जातींमध्ये द्वेष वाढविणाऱ्या शक्तीच देशाचे देशद्रोही असतात. हिंदु-मुस्लीम एकता या देशाला वाचवेल. यासाठी तरुणांनी चिकित्सक बुद्धी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा असे आवाहन जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथील निवृत्त प्राध्यापक, साहित्यिक आणि लेखक चमनलाल यांनी केले. इकरा संस्थेच्या एच.जे.थीम महाविद्यालय येथे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इकरा शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १५० वी गांधी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष करीम सालार तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर येथील अंनिसचे राज्य सरचिटणीस हरिदास तम्मेवार, भुसावळ येथील कोटेचा महाविद्यालयाचे प्रा. सोपान बोराटे, अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे हे होते. यावेळी प्रा. चमणलाल यांनी, सत्याचे अन्वेषण करणे म्हणजेच इतिहास असतो. दुर्दैवाने समाजात खोटा इतिहास सांगितला जातो. त्यावर आपण विश्वास ठेवु नका. मी सांगतो म्हणुन, किंवा पुस्तकात लिहिले आहे म्हणुनही स्विकारु नका. सर्व विचारसरणीची पुस्तके वाचायला हवी. नंतर समिक्षा करावी व आपले मत तयार करावे, असे सांगितले. शहीद भगतसिंग समजून घ्यायचे असेल तर स्वातंत्र्यासाठी भगतसिंग यांचे हिंसेचे समर्थन व गांधी यांचे अहिंसा हे दोन्ही आंदोलन आपापल्या परीने पुरक आहेत. देशाला वाचवण्यासाठी या दोन्ही शक्तींचा वापर करण्याची गरज आहे. शहीद भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर आझाद यांचा खरा इतिहास त्यांनी मांडला. अध्यक्षस्थानावरून करीम सालार यांनी हिंदू मुस्लिम एकता, मॉबलिंचींग व आजच्या राजकीय परिस्थिती यावर प्रकाश टाकला. प्रा.दिगंबर कट्यारे यांनी अंनिस चळवळीच्या संघटनात्मक कार्याची माहिती देवून सत्यावर व संघर्षावर चालणारी चळवळ असल्याचे सांगितले. सुत्रसंचलन प्रा.राजेश भामरे यांनी, प्रास्ताविक प्राचार्य प्रा.डॉ.शुजाअत अली सैय्यद यांनी केले. डॉ.ताहेर शेख, डॉ.इकबाल शाह, मजिद झकेरिया, अनिसचे शहर अध्यक्ष अश्पाक पिंजारी व चांदखान हे उपस्थित होते. अंनिस कार्यकर्ते गुरुदास पाटील, जितेंद्र धनगर,प्रा.दिलीप भारंबे, प्रा.हर्षल पाटील यांनी सहकार्य केले.