भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ रेल्वेस्थानकात जवळील रेल्वे युनियन ऑफिस समोर किरकोळ कारणावरून एका तरुणाला अनोळखी चार जणांनी चाकू, फायटर आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी ७ मे रोजी मध्यरात्री १.३० वाजता समोर आला आहे. या संदर्भात दुपारी ४ वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अभिषेक रमेशचंद्र रावत वय-२१, रा. कावेरी कॉलनी भुसावळ हा तरुण बुधवारी ७ मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे युनियन ऑफिस कार्यालयासमोरून पायी जात होता. त्यावेळी समोरून अनोळखी चार जण त्याच्याकडे आले. दरम्यान किरकोळ कारणावरून त्याच्याशी भांडण केले, त्यानंतर काहींनी अभिषेक रावत याला त्याला चाकू, फायटर आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला जीवेठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान या घटनेबाबत अभिषेक रावत याने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार दुपारी ४ वाजता अनोळखी ४ जणांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भंडारे करीत आहे