युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील पक्षातून निलंबीत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जाहीरपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थन करणारे युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांना पक्षाने निलंबीत केले असून याबाबतचे पत्र आज जारी करण्यात आले आहे.

काल अकस्मातपणे अजितदादा पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी विद्यमान राज्यसरकारला पाठींबा देत मंत्रीपदाची शपथ घेतल्याने राजकीय वर्तुळ हादरले आहे. यामुळे पदाधिकार्‍यांना नेमकी काय भूमिका घ्यावी ? हे कळेनासे झाल्याने बहुतांश नेते आणि पदाधिकार्‍यांनी अद्याप आपापल्या भूमिका जाहीर केलेल्या नाहीत. तथापि, अजितदादा पवार यांचे कट्टर समर्थक मानल्या जाणारे विनोद देशमुख तसेच युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी आपल्या समर्थकांसह कालच जल्लोष करत आपण दादांसोबत असल्याचे जाहीर केले होते.

हे देखील वाचा : युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील अजितदादांसोबत !

रवींद्र नाना पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह भुसावळात जल्लोष केला होता. यानंतर राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयाच्या समोर देखील ते आनंदोत्सव करतांना दिसून आले. यानंतर त्यांनी आपण अजितदादांच्या सोबत जाणार असल्याचे जाहीर देखील केले होते.

दरम्यान, आज सायंकाळी युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी एक पत्रक काढून युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील आणि जिल्हा शहर कार्याध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांना निलंबीत करत असल्याचे नमूद केले आहे. या पदाधिकार्‍यांनी पक्षाचे नाव, चिन्ह आणि पद वापरू नये, असे करतांना आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे देखील या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या माध्यमातून अजितदादांसोबत गेल्याने पक्षातून निलंबीत करण्यात आलेले रवींद्र नाना पाटील हे पहिले तर सुशीलकुमार शिंदे हे दुसरे पदाधिकारी ठरले आहेत. तर एकूणच राष्ट्रवादीच्या मालकीबाबत कायदेशीर पेच सुरू झाल्याने आगामी काळात दोन्ही गट आपापल्या नियुक्त्या करतील असे मानले जात आहे.

Protected Content