जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी येथे कामावरून सुटल्यानंतर मुख्य गेटवर पंचिंग करण्याच्या कारणावरून एका १९ वर्षीय तरुणाला शिवीगाळ करत हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे, तर धारदार शस्त्राने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. ही धक्कादायक घटना ३० एप्रिल रोजी रात्री सुमारे अकरा वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी, ३ मे रोजी दुपारी चार वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल नारायण शेळके (वय १९, राहणार तुळजाई नगर, कुसुंबा, जळगाव) हा तरुण एमआयडीसीतील सुप्रीम कंपनीत कामाला आहे. नेहमीप्रमाणे ३० एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता कामावरून सुटल्यानंतर तो कंपनीच्या मुख्य गेटवर थांबून पंचिंग करत होता. याच वेळी मुशरफ हुसेन परवेज अहमद खान (रा. नेहरूनगर) आणि सकलेन शेख या दोघांनी त्याला पंचिंग करण्याच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि वाद घातला.
या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींपैकी एकाने हर्षलच्या डोक्यात हॉकी स्टिकने जोरदार प्रहार केला, तर दुसऱ्याने धारदार वस्तूने त्याच्या शरीरावर वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर जखमी अवस्थेत असलेल्या हर्षल शेळकेला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेतल्यानंतर हर्षल शेळके यांनी शनिवारी, ३ मे रोजी दुपारी चार वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या प्रकाराची सविस्तर तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, मुशरफ हुसेन परवेज अहमद खान आणि सकलेन शेख या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक गाडेकर करत आहेत.