पिस्तुल व जीवंत काडतुसासह तरूणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील गोराडखेडा येथे एका २६ वर्षीय तरुणाजवळ ५ जिवंत काडतुसा सह एक पिस्टल आढळुन आल्याने ऐन गणपती उत्सवाच्या पुर्व संध्येला पाचोरा पोलिसांनी सापळा रचून तरुणास जाळ्यात घेतल्याने पुढील होणारा अनर्थ टळला आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, काल १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गोराडखेडा गावातील गैइबन शहा अली बाबा दर्ग्या जवळ एक तरुण कमरेला पिस्टल लावुन फिरत असल्याची माहिती गुप्त खबर्‍या कडुन पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांना मिळाली होती. सदरची माहिती पो. कॉ. योगेश पाटील यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना दिल्याने त्यांनी लगेचच पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पो. कॉ. योगेश पाटील, राहुल बेहरे, विश्वास देशमुख, प्रकाश शिवदे, संदिप भोई, विनोद बेलदार यांचे पथक तयार करुन घटना स्थळाकडे रवाना केले.

पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी साध्या गणवेशात सापळा रचून संशयीत तरुणास पिस्टल व जिवंत काडतुस सह शिताफीने ताब्यात घेतले. याप्रकरणी पो. कॉ. योगेश पाटील यांच्या फिर्यादीवरून गौरव राजेंद्र पाटील (वय – २६) रा. गोराडखेडा ता. पाचोरा याचे विरुध्द भाग – ६ गु. र. नं. ३४३ / २३ भादवी शस्त्र अधिनियम कायदा कलम ३ / २५ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन गौरव राजेंद्र पाटील याचेकडुन २५ हजार रुपये किंमतीची पिस्टल व ५ जिवंत काडतुसे तसेच त्याच्या ताब्यातील ४० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे हे करीत आहे. गणेश उत्सवाच्या पुर्व संध्येला शहरात सर्वत्र खरेदीची वर्दळ सुरू असतांना शहरा पासुन दोन कि. मी. अंतरावर जिवंत काडतुसे व पिस्टल बाळगणारा तरुण पाचोरा पोलिसांच्या सापळ्यात अडकल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे पुढील होणारा अनर्थ टळल्याने पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या सह तपास पथकाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

Protected Content

%d bloggers like this: