विजेच्या धक्क्याने तरूणाचा दुदैवी अंत; परिसरात शोककळा !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तीन दिवसांपासून काम नसल्याने वेल्डिंगच्या कामावर गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (२५ ऑक्टोबर) रोजी दुपारी १२ वाजता उस्मानिया पार्क परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जळगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आवेश अली परवेज अली (वय २१) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. आवेश अली हे उस्मानिया पार्क परिसरात राहत होते. त्यांनी रेफ्रिजरेशन या ट्रेडमध्ये आयटीआयचे शिक्षण पूर्ण केले होते आणि ते नियमितपणे एसी व फ्रिज दुरुस्तीचे काम करत असत. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून त्यांना काम नव्हते, त्यामुळे त्यांनी सुटी घेतली होती.

शनिवारी (२५ ऑक्टोबर) रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आवेश अली हे उस्मानिया पार्क परिसरातील एका वेल्डिंग दुकानावर काम करण्यासाठी गेले होते. वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक त्यांचा पाय उघड्या असलेल्या वीज वाहक वायरवर पडला. यामुळे त्यांना जबरदस्त विजेचा धक्का बसला आणि ते जागेवरच बेशुद्ध पडले.

अपघाताची माहिती मिळताच त्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कामधंद्यासाठी गेलेल्या तरुणाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.