बेरोजगारीच्या नैराश्यातून चिखली येथे तरुणाची आत्महत्त्या

 

khushal

जळगाव, प्रतिनिधी । बेरोजगारीच्या नैराश्यातून यावल तालुक्यातील चिखली येथील तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी फैजपुर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

अधिक माहिती अशी की, खुशाल उर्फ सुरेश विठ्ठल पाटील (वय २५) रा. चिखली बुद्रुक हा तरुण गेल्या दोन महिन्यांपासून नोकरीच्या शोधात होता. दरम्यान गेल्या दोन महिन्यांपूर्वी ज्या म्हशीवर घराचा उदरनिर्वाह सुरू होता, तिचा अचानकपणे चाऱ्यातून विषबाधा होऊन मृत्यू झाला होता. या घटनेमुळे त्याला नैराश्य येवून गेल्या दोन महिन्यांपासून त्याचे मानसिक संतुलन ढासळलेले होते.

त्याच अवस्थेत त्याने आज दुपारी घरात कोणीही नसताना दोरीच्या सहाय्याने छताला गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यावेळी त्याचे आई-वडील शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते तर लहान बहीण बाहेरगावी गेली आहे. दरम्यान खुशालचे वडील विठ्ठल पाटील हे शेतातून घरी आले असता दरवाजा दोघी बाजूंनी बंद आढळला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता खुशालने गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. फैजपूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content