Home Cities जळगाव जळगावात यौमे आशुरा भक्तिभावाने साजरा 

जळगावात यौमे आशुरा भक्तिभावाने साजरा 

0
110


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुस्लिम बांधवांचा पवित्र सण यौमे आशुरा शुक्रवार, दि. २६ जून २०२६ रोजी जळगाव शहरात अत्यंत भक्तिभाव, श्रद्धा आणि शांततेच्या वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातील विविध मशिदींमध्ये विशेष नमाज, प्रार्थना तसेच धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला.

यौमे आशुरानिमित्त सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान सुन्नी जामा मस्जिद, भिलपुरा तसेच शहरातील विविध मशिदींमध्ये नमाजे आशुरा (विशेष नमाज) अदा करण्यात आली. यावेळी दुआए आशुरा (विशेष प्रार्थना), हम्द, सना, नाते पाक आणि मनकबत पठण करण्यात आले. त्यानंतर कुरआन खानी व फातेहा खानी करण्यात आली.

या प्रसंगी मुस्लिम बांधवांनी देशात शांतता, सुख-समृद्धी आणि सर्वांच्या कल्याणासाठी विशेष दुआ केली. “अल्लाहने सर्वांवर आपली रहमत व करम करावे, देशात अमन-शांतीचे वातावरण निर्माण व्हावे तसेच नैसर्गिक आपत्ती व संकटांपासून सर्वांचे संरक्षण व्हावे,” अशी प्रार्थना करण्यात आली. यौमे आशुरानिमित्त अनेक मुस्लिम कुटुंबांनी आपल्या घरी विविध खाद्यपदार्थ तयार केले होते. यामध्ये दलीम, दही चोंगा, हलवा, गोड भात, नानखटाई तसेच दूध आणि सुका मेवा मिश्रित शबील (सरबत) यांचा समावेश होता. शहरातील विविध गल्ली-बोळांमध्ये व रस्त्यांवर शबील तयार करून नागरिकांना वाटप करण्यात आले.

जळगावातील भिलपुरा आणि सुभाष चौक परिसरात आकर्षक ताजिया तयार करून नागरिकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. धार्मिक वातावरणात नागरिकांनी ताजियाचे दर्शन घेतले. या धार्मिक कार्यक्रमावेळी सुन्नी जामा मस्जिद भिलपुरा जळगाव व सुन्नी ईदगाह ट्रस्ट जळगावचे अध्यक्ष सय्यद अयाज अली नियाज अली, मौलाना जाबीर रझा अमजदी, मौलाना फिरदौस रजा, हाजी सत्तार शेख, हाजी गुलाम रसूल, हाजी शकूर बादशाह, हाजी नासिर अली, हाजी शेख सिराजुद्दीन, इम्रान खान, जलालुद्दीन शेख, जावेद अहमद यांच्यासह मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound