जळगाव–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील आमोदे या छोट्याशा गावातील योगेश ललित पाटील यांनी 2024 च्या युपीएससी परीक्षेत उत्तुंग यश मिळवून संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. विशेष बाब म्हणजे, त्यांनी कोणताही क्लास लावलेला नाही. स्व-अभ्यासावर विश्वास ठेवत, तब्बल पाच वर्षांची अविरत मेहनत घेत युपीएससी सारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण केली. योगेश यांचे महाविद्यालयीन शिक्षण अंबरनाथ येथे आत्याकडे राहून झाले. यानंतर त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण NIT नागपूर येथून पूर्ण केले.
ते आमोदे गावात राहूनच अभ्यास करत होते. त्यांच्या या यशात कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्यांची आई नितूबाई गृहिणी असून वडील ललित पाटील यांचे छोटेसे किराणा दुकान आहे. अशा साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या मुलाने देशातील सर्वोच्च सेवांसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत यश मिळवले आहे. त्याच्या शिक्षणासाठी आजी जनाबाई आणि आजोबा पंढरीनाथ पाटील यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारची अडचण योगेशला जाणवू दिली नाही. “आम्ही केलेल्या कष्टाचे आज चीज झाले,” असे आजी आजोबांनी आनंदाने सांगितले.
योगेशचे आजोळ एरंडोल तालुक्यातील खडके खुर्द येथे आहे. ते प्रगतीशील शेतकरी चुडामन त्र्यंबक पाटील (गोकुळ नाना) व सौ. सुशीला ताई यांचे नातू आहेत. तसेच, विकासो चेअरमन महेंद्रसिंग पाटील व युवासेनेचे बबलू पाटील हे त्याचे मामा आहेत. त्यांनीही या यशासाठी योगेशचे सतत प्रोत्साहन केले. त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केले की, योगेश हा समाजासाठी प्रेरणास्रोत ठरेल अशी आमची अपेक्षा आहे.
या यशामुळे संपूर्ण गावात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी योगेशचे विशेष स्वागत करत अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातून, स्वबळावर मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.