नवी दिल्ली वृत्तसंस्था । सध्या सुरू असणार्या कोरोनाच्या आपत्तीमध्ये योग हा आशेचा किरण असून याच्या माध्यमातून निरोगी समाज निर्मिती शक्य असल्याचे प्रतिपादन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. जागतिक योगदिनाचे औचित्य साधून देशवासियांना संबोधित करतांना ते बोलत होते.
नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने देशवासियांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी म्हटलं “आज जेव्हा संपूर्ण जग कोरोनाशी लढत आहे तेव्हा योगा लोकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. भारतात कोणताही मोठा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला नसला तरी योग दिनाचा उत्साह कमी झालेला नाही. करोना असतानाही योग दिवसाची थीम ‘योगा फॉर वेलनेस’ने करोडो लोकांमध्ये योगाप्रती उत्साह वाढवला आहे”.
“कोरोनाच्या गेल्या दीड वर्षात अनेक देशांनी संकटाचा सामना केला आहे. लोक योगाला विसरु शकत होते पण त्याउलट लोकांमध्ये योगाचा उत्साह, प्रेम अजून वाढलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात अनेकांनी योगाला सुरुवात केली आहे. डॉक्टरांनी स्वत: आणि रुग्णांसाठी योगाचा वापर केला. आजारातून बाहेर पडल्यानंरही योगा महत्वाचा आहे,” असं मोदींनी यावेळी सांगितलं.
“योगामुळे फक्त शारिरीकच नाही तर मानसिक आरोग्य सदृढ होण्यासही मदत मिळते. योग आपल्याला तणावातून सामर्थ्याकडे नेत आहे. योग आपल्याला नकारात्मकतेतून क्रिएटिव्हीटीकडे नेत आहे. बाहेर कितीही संकट असलं तरी आपल्याकडे तोडगा असल्याचं योगा सांगत आहे,” असं मोदी म्हणाले.
यासोबतच भारतानं जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून तयार केलेल्या M-Yoga App चं मोदींनी लाँचिंग केलं. या अॅपमध्ये कॉमन योगा प्रोटोकॉलच्या आधारावर योग प्रशिक्षण योग प्रशिक्षण देणारे व्हिडिओ जगातील वेगवेगळ्या भाषांमध्ये असतील. योगाची माहिती फ्रेंच, इंग्रजी, हिंदीसह संयुक्त राष्ट्रांच्या भाषांमध्ये येत्या काही महिन्यात उपलब्ध होणार आहे. अॅप पूर्णपणे सुरक्षित असून युझरचा कोणताही डेटा यातून घेतला जात नाही. १२ ते ६५ वर्षे वयोगटातील व्यक्ती या अॅपच्या माध्यमातून योगा शिकू शकतात.