मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटर बाँबनंतर भाजप नेते निलेश राणे यांनी या प्रकरणावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. कुणी गुढगे टेकले तरी जेल वारी अटळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्राने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून चर्चांना उधाण आले असतांनाच भाजप नेते निलेश राणे यांनी याच मुद्यावरून शिवसेनेवर टिकास्त्र सोडले आहे. राणे म्हणाले की, “प्रताप सरनाईक यांना आता जेल दिसायला लागलं. यांच्या सर्व मंत्र्यांना जेलजवळ दिसलं म्हणून युती पाहिजे. यानंतर आता अनिल परब आहेत. जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका आणि बघा कुठे माफी मिळते का? अशी माफी मिळत नाही. यांचे गुडघे पण जेलमध्येच टेकावे लागले तरी त्यांना माफी नाही,” असे निलेश राणे म्हणाले.
“उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य चालवतायेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत कुठे? ज्या ठिकाणी पवारांचे आमदार आहेत. त्याठिकाणी निधी दिला जातो. या सत्तेत नामधारी म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत,” अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.