चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा नगरपरिषदेच्या सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून बचत गटातील महिलांसाठी योग व ध्यान सत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले. चोपडा शहर उपजीविका केंद्र, चोपडा नगर परिषद येथे झालेल्या या उपक्रमातून महिलांना योग, ध्यान, मानसिक स्वास्थ्य तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन नगराध्यक्षा नम्रताताई पाटील आणि मुख्याधिकारी विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समूह संघटक अरुण राजपूत यांनी केले. यावेळी बचत गटातील महिलांना दैनंदिन जीवनात योग व ध्यानाचे महत्त्व पटवून देतानाच आरोग्य आणि आत्मनिर्भरतेचा संदेश देण्यात आला.शहर अभियान व्यवस्थापक गणेश पाठक यांनी बचत गटातील महिलांना केंद्र शासनाच्या पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शहरातील छोटे व्यावसायिक तसेच बचत गटातील महिलांनी उपलब्ध शासकीय योजनांचा उपयोग करून आपल्या व्यवसायाला चालना द्यावी आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी योगाची प्रात्यक्षिके करून दाखवत महिलांना प्रत्यक्ष योगाभ्यासाची माहिती दिली.

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय, ओम शांती सेंटर, चोपडा येथील शीतल दीदी यांनी ध्यानसाधनेविषयी महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी उपस्थित महिलांना ध्यानसाधनेचा अनुभव देत योग आणि ध्यानाचा दैनंदिन जीवनातील उपयोग समजावून सांगितला. जीवनात संयम आणि सहनशीलता जोपासण्यासाठी योगसाधना व ध्यान उपयुक्त ठरू शकते, असे मार्गदर्शन त्यांनी केले. योग आणि ध्यानाच्या माध्यमातून शरीरासोबतच मनाचे संतुलन राखण्याचे महत्त्वही यावेळी स्पष्ट करण्यात आले. महिलांच्या दैनंदिन जबाबदाऱ्या, कौटुंबिक जीवन आणि व्यवसाय सांभाळताना मानसिक शांतता व सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नियमित योगसाधना आणि ध्यानाचा सराव करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमास उपमुख्याधिकारी संजय मिसर उपस्थित होते. शहर समन्वयक अजिंक्य शिंपी यांनी बचत गटातील महिलांना घरकुल योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केले. शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन पात्र लाभार्थ्यांनी त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. चोपडा शहर उपजीविका केंद्राच्या समन्वयक संदीपा देशमुख आणि सहाय्यक घनश्याम वैद्य यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. बचत गटातील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या योग-ध्यान सत्रातून आरोग्य, मानसिक समाधान, सामाजिक सहभाग आणि आर्थिक स्वावलंबन या विविध पैलूंवर मार्गदर्शन मिळाले.



