होय. . . उन्मेष पाटील शिवसेना-उबाठामध्ये प्रवेश करणार : संजय सावंत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज | खासदार उन्मेष पाटील हे आपल्या सहकार्‍यांसह लवकरच शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याचे थेट वक्तव्य पक्षाचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केल्याने हा प्रवेश सोहळा निश्‍चीत झाल्याचे मानले जात आहे.

जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचे तिकिट कापण्यात आले असून त्यांच्या जागी स्मीता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची कामगिरी चांगली असतांना देखील त्यांचे तिकिट कापल्याने अनेकांना आश्‍चर्य वाटत आहे. भाजपमधील अंतर्गत संघर्षातून उन्मेषदादांचा गेम करण्यात आल्याची चर्चा आता होत आहे. खुद्द उन्मेष पाटील यांनी आपल्याला पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले असले तरी ते उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. स्वत: उन्मेष पाटील अथवा त्यांच्या सौभाग्यवती संपदाताई पाटील यांना शिवसेना-उबाठा पक्षाकडून उमेदवारी मिळेल असे मानले जात आहे.

खासदार उन्मेष पाटील हे आपल्या समर्थकांसह आज दुपारी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. आपली खासदार संजय राऊत यांच्याशी मैत्री असून यासाठीच आपण मातोश्रीवर आले असल्याची माहिती उन्मेष पाटील यांनी याप्रसंगी दिली. तर, संजय राऊत यांनी उन्मेष पाटील हे नाराज असून त्यांनी आपली मन की बात उध्दव ठाकरे यांना सांगितली असून याबाबत उद्यापर्यंत आपल्याला सर्व काही कळेल असे सांगितले.

दरम्यान, यानंतर जळगावचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी संपर्क साधला. ते म्हणाले की, खासदार उन्मेष पाटील यांच्यावर अन्याय झाला असून या संदर्भातील माहिती त्यांनी स्वत: उध्दव ठाकरे व संजय राऊत यांना दिली आहे. याप्रसंगी विस्तृत चर्चा झाली असून या संदर्भात आज सायंकाळी अथवा उद्या प्रवेश होणार असल्याचे संजय सावंत म्हणाले.

Protected Content