मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गिरीश महाजन यांनी दंगलीबाबत केलेल्या वक्तव्याशी आपण सहमत असल्याचे प्रतिपादन आज खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
सध्या छत्रपती संभाजीनगर येथील हिंसाचारावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कालच राज्याचे ग्रामविकास, वैद्यकीय शिक्षण तथा क्रीडा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी या प्रकरणी आरोप केला होता. सदर दंगल ही जाणीवपूर्वक घडून आणलेली दिसून येत आहे. काही जणांना त्यांची व्होट बँक तयार करावयाची आहे, त्याचप्रमाणे ती टिकवायची आहे. त्याकरिता जाणीवपूर्वक अशा प्रकारे कृत्य घडवले गेले आहे. याअनुषंगाने तपास यंत्रणांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
याप्रसंगी गिरीश महाजन यांनी विरोधकांवर जोरदार टिकास्त्र देखील सोडले होते. याबाबत ते म्हणाले होते की, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर झाल्यापासून अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. त्यामुळे या दंगलीवरून काही जणांना राजकारणच करायचे असून त्याप्रमाणे ते वागत आहेत. शांत डोके ठेवून केलेला हा प्रकार दिसून येत असल्याचे ना. गिरीश महाजन म्हणाले होते.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना गिरीश महाजन यांच्या बोलण्याला दुजोरा दिला. ते म्हणाले की, गिरीश महाजन हे अगदी बरोबर बोलत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दंगलीवरून काही जणांना राजकारण करायचे आहे. राज्यातील जनतेचा विद्यमान सरकारला सुरू असलेला विरोध पाहूनच हे प्रकार सुरू असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला.