अंत्ययात्रेत शिरला भरधाव ट्रॅक्टर : यावल येथील थरारक प्रकाराने खळबळ

यावल अय्यूब पटेल | शहरातील गौण खनिज व वाळू तस्करी करणारे ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेण्याचा प्रयत्न करणार्‍या चालकाने हेच ट्रॅक्टर भरधाव वेगाने अंत्ययात्रेत घातल्याने प्रचंड खळबळ उडाली. लोकांनी प्रसंगावधान राखून बाजूला झाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. अन्यथा येथे आज अनेक जण मृत्यूमुखी पडण्याची भिती होती. या चालकाला अटक करण्यात आली आहे.

येथील पोलीस स्टेशनच्या आवारातुन महसुल प्रशासनाने कार्यवाहीत करून पोलीस स्टेशनला लावलेल्या गौण खनिज, वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर घेवुन पसार होणार्‍यास पोलीसांनी नागरीकांच्या मदतीने पकडण्यात यश आले आहे. या संदर्मात मिळालेल्या माहीतीनुसार आज दिनांक १५ जुलै रोजी यावलचे तहसीलदार महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखालील महसुल प्रशासनाच्या पथकाने हिंगोणा परिसरातुन अवैद्य गौण खनिजची वाहतुक करतांना कार्यवाही करून ते गौण खनिजची चोरटी वाहतुक करणारे एमएच १९ ए एन १२१६ या क्रमांकाचे ट्रॅक्टर वाहन हे पुढील दंडात्मक कारवाईसाठी पोलिस स्थानकात जमा केले होते. यानंतर सायंकाळी साडेसातच्या सुमारास ट्रॅक्टर चालक श्रीराम सुरेश सोनवणे (राहणार भालशिव तालुका यावल) याने पोलीस स्टेशनच्या आवारातुन ट्रॅक्टर घेऊन पळ काढला. पोलीस कर्मचार्‍यांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र तो थांबला नाही व सुसाट वेगाने पळाला.

दरम्यान, कर्मचारी मागे धावत असल्याचे पाहून चालकाने अतिशय वेगाने आपले ट्रॅक्टर पुढे दामटले. दरम्यान, पोलीस स्थानकाच्या बाहेरच एक अंत्ययात्रा समोरून येत होती. ट्रॅक्टर चालकाने अतिशय वेगाने धावणारे आपले ट्रॅक्टर थेट अंत्यात्रेवरच घातले. समोरून येणारे ट्रॅक्टर पाहून लोकांनी तातडीने बाजूला धाव घेतली. यामुळे काही क्षणात येथे प्रचंड गोंधळ उडाला. जर लोक बाजूला झाले नसते तर येथे अनेक लोकांचा बळी जाण्याची शक्यता होती.

यानंतर सदर ट्रॅक्टर चालकाने भुसावळ टि पॉइंटवर एका कार चालकाला कट मारला. यात त्या कारचे नुकसान झाले. भुसावळ मार्गाने शहरातील सुन्दर नगरी परिसराकडे जात असतांना त्याला नागरीकांच्या मदतीने पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजमल पठाण ,पोलीस अमलदार युनुस जुम्मा तडवी , संजय देवरे, राहुल चौधरी , राजेश वाढे यांनी पाठलाग करून पकडले.

ट्रॅक्टर चालक श्रीराम सुरेश सोनवणे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या प्रकारामुळे शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content