शेंदुर्णी येथील आषाढी एकादशी यात्रा बंद; शांतता समितीच्या बैठकीत निर्णय

शेंदूर्णी प्रतिनिधी । आगामी आषाढी एकादशी यात्रा उत्सव व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन येथील पोलीस दुरक्षेत्रात आज करण्यात आले होते. यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी यात्रा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

शांतता समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पहुर पोलीस स्टेशनचे सपोनि स्वप्नील नाईक होत. यावेळी नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी जि.प.सदस्य सागरमल जैन, माजी पं.स. उपसभापती सुधाकर बारी, पंडित दीनदयाळ पतसंस्था अध्यक्ष अमृत खलसे, माजी उपसरपंच पंडितराव जोहरे, नगरसेवक शरद बारी, शंकर बारी हभप कडोबा माळी, भगवान त्रिविक्रम मंदिर पुजारी भोपे, बशीर खाटीक, फारूक खाटीक, अकिल खाटीक व पत्रकार उपस्थित होते.

यावेळी कोरोना महामारी व डेल्टा प्लस विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशीला येथील प्रतिपंढरपूर भगवान त्रिविक्रम मंदिरात फक्त ५ व्यक्तीच्या हस्ते पूजा अभिषेक करण्यात येईल व त्यानंतर मंदिर पूर्णपणे बंद करण्यात येणार असून कुठल्याही भक्तांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, म्हणून भक्त व वारकऱ्यांनी शेंदूर्णी येथे आषाढी एकादशीला देव दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन  प्रशासनाने केले आहे.

यावेळी कोरोना महामारी व डेल्टा प्लस विषाणूजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर नाहक गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शेंदूर्णी नगरपंचायत हद्दीतील भगवान त्रिविक्रम मंदिरात देवदर्शनासाठी भाविकांची येऊ नये, असे मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी आवाहन केले आहे. तसेच शासनाच्या कोरोना निर्देशाचे तंतोतंत पालन करण्यात येणार असल्याचे शांतता समिती सदस्यांच्या सभेत ठरले असून आषाढी एकादशीला येथील प्रतिपंढरपूर भगवान त्रिविक्रम मंदिर दिवसभर पूर्णपणे बंद राहणार आहे. कुठल्याही भक्तांना मंदिरात दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे, म्हणून भक्त व वारकऱ्यांनी शेंदूर्णी येथे आषाढी एकादशीला देव दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. त्याचप्रमाणे मुस्लिम बांधवांनी आगामी बकरी ईद पण सार्वजनिक रित्या साजरी न करता आपापल्या घरीच साजरी करावी असेही आवाहन मुस्लिम समाज बांधवांना पोलीस प्रशासनाचे वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील नाईक यांनी केले आहे.

Protected Content