भाविकांची रिक्षा उलटली; सहा महिलांसह आठ जण जखमी

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील जागृत देवस्थान असणार्‍या श्री मनुदेवी मातेचे दर्शन करून परतणार्‍या भाविकांच्या रिक्षेचा अपघात होऊन सहा महिला, एक मुलगा आणि एक मुलगी असे आठ जण जखमी झाले आहेत.

याबाबत वृत्त असे की, आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खडका, किन्ही आणि भुसावळ येथील काही भाविक मनुदेवी मंदिरावरून दर्शन घेऊन ऍपे रिक्षाने येत होते. मनुदेवी मंदिर ते आडगावच्या दरम्यान एका वळणावर रिक्षाचे संतुलन बिघडल्याने ती पलटली.

यात सहा महिला आणि एक मुलगा व एक मुलगी असे आठ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सौ .अरूणा मदन सपकाळे (वय४५ वर्ष राहणार खडका); सौ. लक्ष्मी प्रभाकर सपकाळे, (वय ४२ वर्ष राहणार खडका); सुनिता महादेव पटोळे; गायत्री महादेव पटोळे आणी रिषीकेश महादेव पटोळे सर्व राहणार किन्ही तालुका भुसावळ आदींसह इतरांचा समावेश आहे.

जखमींना तात्काळ रुग्णवाहीकेव्दारे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ शुभम तिडके यांनी आपल्या आरोग्य कर्मचार्‍याच्या मदतीने प्रथमपचार केले. यातील एक महीलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. वढोदे गावाचे सरपंच संदीप सोनवणे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी जखमींना रूग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली.

Protected Content