फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । माजी खासदार व आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष दिवंगत हरीभाऊ जावळे यांच्या ३ ऑक्टोबर रोजीच्या जयंती दिनी ‘आठवणीतले हरीभाऊ’ या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
माजी आमदार तथा खासदार कृषीमित्र स्व. हरीभाऊ जावळे याची ३ ऑक्टोबर रोजी असलेल्या जयंती निमित्ताने ‘आठवणीतले हरीभाऊ’ या व्हर्चुअल आणि ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन भालोद येथे कृषीमित्र स्व. हरीभाऊ जावळे विचार मंचा तर्फे करण्यात आले आहे.
हरीभाऊ जावळे यांचे वाढदिवस गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य शिबिर, पुस्तक दान, बेटी सन्मान अश्या विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरे केले जात असत. त्यांचे दुखद निधन झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींच्या स्वरूपात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, आचार्य श्री मानेकर बाबा शास्त्री, भक्तीप्रकाशदास शास्त्रीजी, स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कार्यक्रमात केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितिन गडकरी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे, निती आयोग सदस्य नरेंद्र जाधव, जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि माजी संघटन मंत्री रवी भुसारी आदी मान्यवर दिवंगत हरीभाऊ जावळे यांच्या स्मृतींना उजाळा देणार आहेत.
या वेळी बेटी बचावचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके,जैन इरिगेशनचे अशोक जैन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, संघटन मंत्री विजय पुराणीक, शरद ढोले, संघटन मंत्री किशोर काळकर, व्हेंचर कॅपिटलीस्ट भरत खेमका, युदेशी अग्रोचे संचालक मनुभाई उदासी आदी मान्यवर या कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थिती देणार आहेत.
हा कार्यक्रम स्व.हरीभाऊ जावळे मित्र परिवार या फेसबुक पेजवर लाईव्ह प्रसारित करण्यात येणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळून आणि योग्य ती काळजी घेऊनच या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे असे आयोजक कृषीमित्र स्व. हरीभाऊ जावळे विचारमंच तर्फे कळविण्यात आले आहे.