यावल/रावेर प्रतिनिधी । पपई भरून येणारी आयशर यावल तालुक्यातील किनगावजवळ उलटली असून यात १५ मजूरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी याला दुजोरा दिला आहे. अपघातात दोन जण गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत वृत्त असे की नेर (धुळे) येथून पपईने भरून आयशर रावेरला येत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास किनगाव नजिक मोठा अपघात झाला आहे. आयशर पलटी झाल्याने यात असणारे १५ जण जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. मयत सर्व रावेर तालुक्यातील आभोडा, केर्हाळा व रावेर शहरातील असल्याचे वृत्त आहे. हे सर्व जण मजूर असल्याचे समजते. गाडीत एकूण २१ जण होते. यातील १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात नेले आहे.
अपघाताची माहिती मिळताच डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी अपघातस्थळ गाठले असून त्यांनी अपघातातील मृतांच्या आकड्याला दुजोरा दिला आहे. अपघातात मृत झालेल्यांचे मृतदेह यावल येथील ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आलेली आहेत. तर जखमींवर उपचार सुरू आहेत.
(यानंतरचा सविस्तर वृत्तांत आम्ही स्वतंत्र बातम्यांच्या स्वरूपात लवकरच अपडेट करत आहोत.)