अनधिकृत बायो-डिझेल पंपावर कारवाई : दोघांना अटक

यावल प्रतिनिधी । अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर महामार्गावर सुरू असणार्‍या अवैध बायो-डिझेल पंपावर एलसीबीच्या पथकाने छापा टाकून पंप जप्त करत दोघांना अटक केली आहे.

अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर महामार्गावर शहरापासुन तिन किलोमिटरच्या अंतरावरील एका बायोडिझेल पंपावर नाशिक विभागाचे आयजी बी.जे. शेखर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने व जिल्हा स्थानिक गुन्हा शाखेने गुप्त माहीतीच्या आधारावर छापा टाकला. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली असून या प्रकरणी शहरातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या बायोडिझेल पंपावर कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल ते चोपडा रस्त्यावर एका ठिकाणी बायोडिझेलच्या नावाखाली केमिकल मिश्रित डिझेल विक्री होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा गुन्हे शाखेला मिळाली होती. तेव्हा या माहितीनुसार रविवारी ३१ ऑक्टोबर रोजी ९ वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला व संशयित आरोपी शेख राजीद शेख सादीक (वय-३३) रा. बाबानगर यावल, वाहनात बायोडिझेल भरले जात होते त्या वाहनाचा ट्रकचालक वकील जाकीर पठाण ( वय २९, रा. छपरा, ता. पहाडी, जि. भरतपूर, राजस्थान या दोघांना पथकाने ताब्यात घेतले आहे. चौकशी केली असता यावल-चोपडा रस्त्यावर साईकृपा हॉटेलसमोर संशयित शेख वसीम शेख शाहिद व शेख साजिद शेख सादिक यांनी लोखंडी टाकीमध्ये ४ लाख २५ हजार रुपये किंमतीचे सुमारे ५ हजार लिटर बायोडिझेल साठा करून जादा दराने विक्री करून काळाबाजार करत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत कंटेनर ट्रक क्रमांक (एन.एल. ०१ क्यू ५९२१) देखील जप्त करण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई
स्थानीक गुन्हे शाखेचे सपोनि जालिंदर पळे, यावल पो.स्टे.चे सपोनि अजमल पठाण, नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाचे सहाय्यक फौजदार बशीर तडवी, पोलिस नाईक मनोज दुसाने, पो.हे.कॉ. रामचंद्र बोरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना. किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान पठाण, पो.कॉ. सुशिल घुगे, राजेश वाडे यांनी केली.

Protected Content