फलकाला दगड मारल्याप्रकरणी गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कासारखेडा येथील ग्राम पंचायत चौकातील महामानवांची प्रतिमा असणार्‍या फलकावर दगड मारून भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील कासारखेडा येथे दिनांक २५ एप्रिल रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास गावातील ग्राम पंचायत चौकातील समाज मंदीराच्या समोर लावलेल्या फलकावर गावातील हरीश श्रीराम न्हावी याने दगड मारला. या फलकावर महामानवांच्या प्रतिमा असल्याने संबंधीत व्यक्तीने जातीय भावना दुखावल्या प्रकरणी ईश्‍वर आसाराम सोनवणे (रा. कासारखेडा) यांनी फिर्याद दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये भाग ५ भादंवि कलम २९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अजिज शेख हे करीत आहे.

दरम्यान या घटनेचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याने परिसरातील काही कार्यकर्त्यांनी ऑल इंडीया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष शरद बावस्कर यांची भेट घेतली. त्यानंतर शरद बावस्कर यांनी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे प्रत्यक्ष घडलेल्या घटनेची माहीती देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.