यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात तीन कथीत पत्रकारांनी गैरवर्तन केल्याच्या निषेधार्थ कर्मचार्यांनी कार्यालयाबाहेर पाच तास ठिय्या आंदोलन केले.
याबाबत वृत्त असे की गेल्या दहा दिवसापूर्वी चोपडा तालुक्यातील एका शासकीय आश्रम शाळेत घडलेल्या प्रकाराची तसेच कार्यालयाकडून केलेली चौकशी व कारवाईच्या अहवालाची प्रत चोपडा येथील तीन कथित पत्रकारांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशांत माहोरे यांचेकडे मागणी केली. माहोरे यांनी केलेल्या चौकशी व संबंधित कर्मचार्यावर निलंबित केले असल्याची कारवाई केली असल्याचे सांगितले. आम्हास चौकशी अहवाल पाहिजे असा त्यांनी हट्ट धरला यावर चौकशी अहवाल विद्यार्थिनी विषयी असल्याने व तो गोपनीय असल्याने देता येणार नसल्याचे सांगितल्यावर सहाय्यक प्रकल्प अधिकारी माहुरे यांच्याशी त्यांनी वाद घालत प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांचे कक्षात जात त्यांच्याशी जोर जोराने व अर्वाच्य भाषेत बोलत वाद घातला.
या प्रकाराने कार्यालयातील कर्मचारी संतापले. त्यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी तात्काळ पोलीस आले असता तिघेही जण तेथून पसार झाले. त्यानंतर कर्मचार्यांनी सायंकाळपर्यंत कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन देत निषेधाच्या घोषणा दिल्या. यानंतर कर्मचार्यांनी सायंकाळी फौजदार प्रदीप बोरुडे यांचे कडे निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली आहे. याप्रसंगी आदिवासी संघटनेचे राज्याध्यक्ष एम. बी. तडवी उपस्थित होते त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. निवेदनावर ४० कर्मचार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.