लंडन, वृत्तसंस्था । कोरोना रुग्णांसाठी रशियाने लस विकसित केल्याची घोषणा केल्यानंतर अनेक देशांनी आश्चर्य व्यक्त केले होते. या लशीची चाचणी पूर्ण होण्याआधीच लस देण्याचा निर्णय रशियाने घेतला. त्यावर तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. या लशीमुळे करोनाचा संसर्ग अधिक घातक होऊ नये अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
ब्रिटनच्या रिडींग विद्यापीठाचे वायरॉलॉजीचे प्राध्यापक इयान जोन्स यांनी सांगितले की, लस संपूर्णपणे सुरक्षित नसल्यास विषाणू त्या अॅण्टीबॉडीविरोधात आपल्याला अधिक सक्षम करू शकतो. त्यामुळे लशीचा कोणताही परिणाम न होणारे असे काही स्ट्रेन निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे लस नसण्यापेक्षा लस असणे हेच अधिक धोकादायक ठरू शकते असा इशारा त्यांनी दिला.
अमेरिकेतील वाँडरबिट युनिर्व्हसिटी ऑफ मेडिसीनचे प्राध्यापक आणि लस तज्ञ कॅथरीन एडवर्डस यांनी सांगितले की, लशीचा विषाणूवर काय परिणाम होऊ शकतो, विषाणूंचा कितपत सामना करेल, अथवा या लशीचा परिणाम उलटा होईल, आदी चिंता निर्माण करणारे प्रश्न अनुत्तरीत असल्याचे त्यांनी म्हटले.
बॉस्टनमध्ये बेथ इस्रायल टिकनेस मेडिकल सेंटरमधील तज्ञ डॅन यांनी सांगितले की, कोरोनाच्या विषाणूमध्ये म्युटेशनचा दर हा एचआयव्हीच्या विषाणूपेक्षा कमी आहे. त्याशिवाय परिणामकारक न ठरलेल्या लशीचा वापर करणे हे धोकादायक ठरू शकते. शास्त्रज्ञांनी म्हटले की, अनेकदा विषाणू अॅण्टीबायोक्टिसविरोधात स्वत:ची प्रतिकारक क्षमता वाढवतात आणि शरीरात अधिकच फैलावतात.
रशियाच्या लशीवर पाश्चिमात्य देशांनी आक्षेप घेतला होता. रशियाने चाचणीबाबतची माहिती उघड केली नव्हती. त्याशिवाय रशियाने केलेल्या चाचण्या या जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशांप्रमाणे नसल्याचे म्हटले गेले. आता, रशियाने आपल्या लशीची माहिती देण्यास होकार कळवला आहे. ४० हजारजणांवरील चाचणीची माहिती जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणार आहे.